मेजावांना जायचंय चंद्रावर, पृथ्वीच्या खाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 01:22 PM2022-01-14T13:22:32+5:302022-01-14T13:25:02+5:30

अंतराळात जाण्याचं भाग्य फारच थोड्या भाग्यवंतांना मिळतं. पूर्वी ते फक्त संशोधक, अभ्यासक आणि शास्त्रज्ञांनाच मिळत होतं.

The parties want to go to the moon, under the earth! | मेजावांना जायचंय चंद्रावर, पृथ्वीच्या खाली!

मेजावांना जायचंय चंद्रावर, पृथ्वीच्या खाली!

Next

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा १९८४ मध्ये पहिल्यांदा अंतराळात गेले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचा अंतराळातून संवाद झाला होता. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांना विचारले होते, अंतराळातून तुम्हाला आपला भारत देश कसा दिसतो आहे?  पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राकेश शर्मा यांनी दिलेलं उत्तर आजही भारतवासीयांच्या स्मरणात आहे. राकेश शर्मा यांचे त्यावेळचे उद्गार होते, ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा !...’

अंतराळात जाण्याचं भाग्य फारच थोड्या भाग्यवंतांना मिळतं. पूर्वी ते फक्त संशोधक, अभ्यासक आणि शास्त्रज्ञांनाच मिळत होतं. आज करोडपती ‘सर्वसामान्य’ लोकही अंतराळात जाऊ लागले आहेत. त्यातलंच एक नाव आहे. युसाकु मेजावा. जपानमधील ते एक अब्जाधीश उद्योगपती आहेत. नुकतेच ते बारा दिवसांचा अंतराळ दौरा करून परत पृथ्वीवर आले. अंतराळातून परतल्यावर लगेच त्यांनी सोशल मीडियावर तेथील आपल्या अनुभवांच्या पोस्ट्स, फोटो आणि व्हिडिओही  शेअर केले आहेत. आपल्या रोमांचक अनुभवाची कहाणी सांगताना त्यांनी अंतराळ प्रवासाचे नुसते किस्सेच  सांगितले नाहीत, तर अंतराळात असताना ब्रशने आपले दात कसे घासायचे, चहा कसा करायचा, यासंदर्भातलंही वर्णन केलं.

२०२३ मध्ये मेजावा यांना चंद्रावरही जायचं आहे. जे संशोधक, अंतराळ अभ्यासक नाहीत, अशाही अनेकांना आज अंतराळात जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मदतीनं काही जण अंतराळातही पर्यटन करून आले आहेत. या कंपन्यांमध्ये प्रमुख नावे आहेत, ती म्हणजे एलन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ ही कंपनी, जेफ बेझोस यांची ‘ब्लू ओरिजिन’ ही कंपनी, याशिवाय ‘व्हर्जिन अटलांटिक’, ‘एक्ससीओआर एरोस्पेस’, ‘आर्माडिलो एरोस्पेस अशा अनेक कंपन्या आता लोकांना अंतराळ पर्यटनाला घेऊन जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

‘स्पेस ॲडव्हेन्चर्स’ ही कंपनी तर पर्यटकांना अंतराळातही थरारक अनुभव मिळवून देणार आहे. मेजावा यांनी एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ या कंपनीशी कधीचाच करार केला असून,  मस्क यांच्यासोबत २०२३ मध्ये ते चंद्रसफारीही  करणार आहेत.  ही सफारी केल्यानंतर चंद्रावर जाणारे ते पहिले ‘सर्वसामान्य’ व्यक्ती असतील. हा ‘इतिहास’ रचण्यासाठी ते उत्सुक आहेत. 

राकेश शर्मा यांनी अंतराळातून दिसणाऱ्या भारताचं जसं वर्णन केलं होतं, साधारण तसंच वर्णन मेजावा यांनीही पृथ्वीबाबत केलं आहे. मेजावा म्हणतात, जेव्हा तुम्ही अंतराळात जाता, तेव्हा तुम्हाला पृथ्वीची महत्ता कळते. या अंतराळ यात्रेने पृथ्वीबद्दल मला अधिक कृतज्ञ केले आहे. पृथ्वीप्रमाणेच अंतराळातही हवा आहे, वास आहे आणि अनेक ऋतूही आहेत याबद्दल आपण निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. अंतराळातही नंतर मानवी वस्ती वाढेल, याविषयी मी आशावादी आहे.

मेजावा पुढे सांगतात, शून्य गुरुत्वाकर्षणात चहा बनवणं, स्वच्छ कपड्यांची कमतरता यासारखी आव्हानं होती, पण एकूणच तो अनुभव अतिशय शानदार होता. अंतराळात शिरतानाचा अनुभव तर इतका रोमांचक होता, की मला जणू काही वाटलं, ‘शिन्कासेन’ (जपानी बुलेट ट्रेन) स्टेशनवरून सुटली आहे. सगळं काही इतकं सुरळीत आणि शांतपणे झालं की, काही कळलंही नाही. जेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहिलं, तेव्हा लक्षात आलं, पृथ्वीची जी छायाचित्रे आपण पाहतो, त्यापेक्षा पृथ्वी शंभर पटींनी जास्त सुंदर आहे.

अंतराळातला अनुभव अतिशय छान असला, तरी शून्य गुरुत्वाकर्षणातून बाहेर येणं, सर्वसामान्य आयुष्यात परत येणं या गोष्टी अजून तरी तितक्याशा सोप्या नाहीत. मी पहिल्यांदा त्यातून बाहेर पडू इच्छितो.अंतराळात काही छोट्या मोठ्या आव्हानांचाही सामना करावा लागतो. एकतर अंतराळात झोप घेणं, झोप येणं ही गोष्ट सोपी नाही. झोप येण्यासाठी आपल्या सतत संघर्ष करावा लागतो. आपलं शरीर धरून ठेवण्यासाठी येथे काहीही नाही. माझ्या मनात आणखीही काही गोष्टींमुळे हिंदोळे सुरू आहेत. त्यातील सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे २०२३ मध्ये चंद्रभेटीसाठी मी अतिशय उत्सुक आहे.

Web Title: The parties want to go to the moon, under the earth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.