मासिक पाळीमुळे त्रास व्हायला लागल्याने तरूणीला विमानातून उतरवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 02:34 PM2018-02-22T14:34:56+5:302018-02-22T14:35:15+5:30
ब्रिटनच्या एका तरूणीला मासिक पाळीतील होणाऱ्या त्रासामुळे जबरदस्ती विमानातून उतरविण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
लंडन- ब्रिटनच्या एका तरूणीला मासिक पाळीतील होणाऱ्या त्रासामुळे जबरदस्ती विमानातून उतरविण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यावेळी या तरूणीचा बॉयफ्रेण्डही उपस्थित होता. महिला व तिचा प्रियकर दुबईला जात होते त्यावेळी ही घटना घडली. विमानाच्या उड्डाणाआधी तरूणीला त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्यांनी विमानातील कर्मचाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली. टाइम्स ऑफ लंडनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बेथ इव्हेंस (वय 24) ही तिचा बॉयफ्रेण्ड जोशुआ मोरानबरोबर (वय 26) 17 फेब्रुवारी रोजी दुपारी इंग्लंडच्या बर्मिघम एअरपोर्टवरून दुबईला जाणार होती. पण विमानात बसल्यावर बेथला पाळीमुळे त्रास व्हायला लागला. तिने याबद्दल विमान कर्मचाऱ्याला याबद्दलची माहिती दिली. फ्लाइट अटेंडेंटने तरूणीच्या त्रासामुळे तिला विमानातून बाहेर जाण्यास सांगितलं. बेथ त्रास होत असल्याने खूप रडत होती. एअरहोस्टेसचे प्रश्न तिला अजिबात आवडत नव्हतं. विमान कर्मचाऱ्यांनी बेथच्या दुखण्याकडे लक्ष दिलं नाही, असं मोरानने सांगितलं.
बेथ व मोरान प्रवास करणार असलेल्या एमिरेट्स या विमान कंपनीने मात्र त्यांच्यावरील आरोप खोडून काढला. बेथला मेडिकल इमर्जन्सीमुळे विमानातून उतरविण्यात आल्याचे स्पष्टीकरण एमिरेट्सने दिलं. एका प्रवाशाला ठिक वाटत नसल्याचं विमान कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं होतं. बेथला त्रास होत असल्याने विमानातून उतरविण्यात आलं. तिला उपचार मिळावे, हा हेतू होता असं त्यांनी म्हंटलं.
यासंपूर्ण प्रकरणावर इव्हेंसने म्हंटलं की, मला जबरदस्तीने विमानातून उतरविण्यात आलं. दुबईला जाण्यासाठी मला पुन्हा तिकिट काढावं लागलं. ज्यासाठी माझा 22 हजार 768 रूपये पुन्हा खर्च झाला. दरम्यान, विमान प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाची प्रकृती बिघडली तर त्याला विमानातून जाण्याची अनुमती दिली जाते, असं एमिरेट्सने म्हंटलं.