Plane Crashes in Nepal नेपाळमध्ये खराब हवामानामुळे प्रवासी विमान काेसळले; प्रवाशांमध्ये ठाण्यातील चौघांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 08:16 AM2022-05-30T08:16:16+5:302022-05-30T10:48:54+5:30
Passenger plane crashes in Nepal due to bad weather; Passengers include four from Thane : विमानाने पोखरा येथून उड्डाण केल्यानंतर पंधरा मिनिटांतच त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.
Plane Crashes in Nepal काठमांडू : नेपाळमध्ये पोखरा येथून जोमसोमला जाणारे तारा एअर या कंपनीचे लहान आकाराचे एक प्रवासी विमान रविवारी कोसळले. या विमानात ठाण्यातील चार जणांसह २२ जण होते. लामचे नदीच्या किनारी कोवांग गावानजिक विमानाचे अवशेष आढळल्याचे नेपाळ सरकारने म्हटले आहे. जिथे विमान कोसळले तिथे पोहोचण्यास खराब हवामानामुळे अनेक अडथळे येत आहेत.
विमानाने पोखरा येथून उड्डाण केल्यानंतर पंधरा मिनिटांतच त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमान जिथे कोसळले तिथे लष्करी जवान तत्काळ रवाना झाले. विमानात ठाण्याच्या चार प्रवाशांसोबत जर्मनीचे दोन व नेपाळचे १३ प्रवासी होते. त्यापैकी अशोककुमार त्रिपाठी, रितिका त्रिपाठी, वैभवी त्रिपाठी, धनुष त्रिपाठी हे एकाच कुटुंबातील चारजण ठाण्याच्या कापुरबावडी भागातील रहिवासी आहेत.
वैमानिकाच्या मोबाइलचा जीपीएसद्वारे घेतला वेध
तारा एअर कंपनीच्या कोसळलेल्या विमानामध्ये वैमानिक कॅप्टन प्रभाकर प्रसाद घिमिरे, सहवैमानिक उत्सव पोखरेल व किस्मी थापा ही हवाईसुंदरी असा कर्मचारी वर्ग होता. विमानाचा पायलट घिमिरेचा मोबाइल सुरू होता. त्यावरून जीपीएसच्या सहाय्याने हे विमान कुठे कोसळले असावे, याचा नेपाळच्या लष्कराला अंदाज आला.