चालत्या विमानाचा दरवाजा उघडून अचानक उतरले दोन प्रवासी; अन्....
By कुणाल गवाणकर | Published: December 23, 2020 01:27 PM2020-12-23T13:27:17+5:302020-12-23T13:28:59+5:30
विमान उड्डाण करण्यासाठी रनवेच्या दिशेनं जात असताना अचानक दोन प्रवाशांनी दरवाजा उघडला
न्यूयॉर्क: विमान उड्डाण करण्यासाठी रनवेच्या दिशेनं जात असताना अचानक दोन प्रवाशांनी दरवाजा उघडल्याची घटना घडली आहे. विमान रनवेकडे जात असताना दोघे एमर्जन्सी दरवाजा उघडून स्लायडर ऍक्टिवेट करून बाहेर पडल्याची माहिती डेल्टा एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी दिली.
डेल्टा एअरलाईन्सचं विमान न्यूयॉर्कहून अटलांटाकडे निघालं असताना दोन प्रवासी एमर्जन्सी दरवाजा उघडून अचानक बाहेर पडले. ३१ वर्षीय एन्टोनियो मर्डॉक आणि २३ वर्षीय ब्रिअना ग्रेसो यांच्यासोबत त्यांचा कुत्रादेखील विमानाबाहेर आला. पोलिसांनी दोन्ही प्रवाशांना ताब्यात घेतलं. दोघेही फ्लोरिडाचे रहिवासी आहेत. एमर्जन्सी दरवाजातून बाहेर पडण्यापूर्वी दोन्ही प्रवाशांनी अनेकदा विमानात त्यांचं आसान बदललं होतं. आपण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरचा सामना करत असल्याचा दावा एन्टोनियोनं केला.
घटनेनंतर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं आणि त्यांना दुसऱ्या विमानातून अटलांटाला पाठवलं गेलं. जॉन्सन नावाच्या एका प्रवाशानं एन्टोनियो आणि ब्रिअनासोबत विमानात आसनांची अदलाबदल केली होती. त्यावेळी एन्टोनियो आपल्याशी व्यवस्थित बोलत होता. त्याच्या वागण्या-बोलण्यातून मला कोणत्याही प्रकारचा संशय आला नाही, असं जॉन्सन यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एन्टोनियो आणि ब्रिअना यांच्याविरोधात खटला चालणार आहे.