प्रेग्नंट महिलेनं करायला लावलं विमानाचं इमर्जन्सी लँडींग, मग जे घडलं ते पाहून अधिकाऱ्यांची झोपच उडाली!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:19 PM2022-12-08T15:19:30+5:302022-12-08T15:20:43+5:30
स्पेनच्या बार्सिलोना एअरपोर्टवर एक अजब घटना घडली आहे. मोराक्कोहून तुर्कीला जाणाऱ्या प्रवासी विमानातून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेनं विमान हवेत असताना प्रसुती वेदना सुरू झाल्याचं सूचना दिली.
बार्सिलोना-
स्पेनच्या बार्सिलोना एअरपोर्टवर एक अजब घटना घडली आहे. मोराक्कोहून तुर्कीला जाणाऱ्या प्रवासी विमानातून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेनं विमान हवेत असताना प्रसुती वेदना सुरू झाल्याचं सूचना दिली. त्यानंतर विमान स्पेनच्या बार्सिलोना विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आलं. पण विमान खाली उतरल्यानंतर निष्पन्न झालं की महिलेला प्रसुती वेदना झाल्याच नव्हत्या आणि या संपूर्ण घटनेत विमानातील २८ प्रवाशांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मोराक्को आणि स्पेन यांच्यातील प्रवासी संकट काही केल्या थांबताना दिसत नाहीय. बुधवारी आफ्रिकी देश मोराक्कोच्या प्रवाशांनी स्पेनमध्ये प्रवेश करण्यासाठी अजब शक्कल लढवली. विमानाचं आपत्कालीन लँडींग करवून विमानातून प्रवास करणाऱ्यांपैकी २८ प्रवाशांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यातील १४ जणांना यशही आलं.
एएफपी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर अॅम्ब्युलन्स आणि पोलीस गस्ती पथक पोहोचले. महिलेला विमानातून उतरवलं जात असताना त्याचवेळी २८ प्रवाशांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यातील १४ प्रवासी पळून जाण्यात यशस्वी झाले.
महिलेची रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता तिला प्रसुती वेदना होतच नव्हत्या तिनं नाटक केल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती स्पेन सरकारनं दिली. यानंतर संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.
१४ प्रवासी पळून जाण्यात यशस्वी
स्पेन सरकारच्या माहितीनुसार, पोलिसांनी तुर्कीच्या पेगासस एअरलाइन्समधून आलेल्या १४ प्रवाशांना ताब्यात घेतलं आहे. तर १४ प्रवासी अजूनही गायब आहेत. पोलिसांनी सांगितलं की यातील पाच प्रवाशांना त्याच विमानात पाठवण्यात आलं, तर उर्वरित ८ जणांना माघारी मोराक्कोला पाठवण्यात येणार आहे.