भारतातून येणाऱ्या प्रवाशांना अमेरिकेमध्ये प्रवेशबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 07:14 AM2021-05-02T07:14:06+5:302021-05-02T07:14:38+5:30
निर्णयात विद्यार्थी, शिक्षक, पत्रकारांना सूट
वॉशिंग्टन : भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून, त्यामुळे बाधित झालेल्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना मंगळवार, ४ मेपासून प्रवेशबंदी करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. हा निर्णय पुढील आदेश मिळेपर्यंत लागू राहणार आहे, असे अमेरिकी सरकारने म्हटले आहे. मात्र या प्रवेशबंदीतून भारतातील विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पत्रकार, काही व्यक्ती यांना वगळण्यात आले आहे.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज ३ लाखांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे भारतातून येणाऱ्या प्रवाशांबद्दल अमेरिकेने सावध भूमिका घेतली आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या अमेरिकेमध्येही गेल्या सव्वा वर्षापासून या संसर्गाने मोठा हाहाकार माजविलेला आहे. भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रवेशबंदी लागू करावी, असा सल्ला सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने अमेरिकी सरकारला दिला होता. भारतातील कोरोनाची भीषण स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी मदत करेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी २६ एप्रिल रोजी सांगितले होते. भारतातील कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर तसेच अन्य वैद्यकीय सामग्री अमेरिकेतर्फे पुरविली जाणार आहे. ऑक्सिजनच्या उत्पादनासाठीही अमेरिका मदत करणार आहे. (वृत्तसंस्था)