पठाणकोट; पाकमध्ये ‘एफआयआर’ दाखल

By admin | Published: February 20, 2016 02:51 AM2016-02-20T02:51:19+5:302016-02-20T02:51:19+5:30

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी प्रशासनाने प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. तथापि, त्यात जैश ए मोहंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याच्या नावाचा उल्लेखच नाही

Pathankot; An FIR has been registered in Pakistan | पठाणकोट; पाकमध्ये ‘एफआयआर’ दाखल

पठाणकोट; पाकमध्ये ‘एफआयआर’ दाखल

Next

लाहोर/इस्लामाबाद : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी प्रशासनाने प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. तथापि, त्यात जैश ए मोहंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याच्या नावाचा उल्लेखच नाही. मसूद या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा भारताचा आरोप आहे.
या हल्ल्याबाबत अनेक आठवडे चाललेल्या चौकशीनंतर अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पंजाब प्रांताच्या गुजरानवाला येथील दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या (सीटीडी) केंद्रात गुरुवारी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्यासंदर्भात गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘एफआयआर’ची आवश्यकता होती, असे सीटीडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. मसूद अझहर हा हल्ल्याचा सूत्रधार असून त्याचा भाऊ रऊफ आणि इतर पाच जणांनी तो घडवून आणल्याचे भारताचे म्हणणे आहे.
पठाणकोट येथील हवाई तळावर दोन जानेवारी रोजी हल्ला झाला होता. चार हल्लेखोरांनी पाकमधूून भारतात येऊन हल्ला केल्याचे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकला कळविले होते. (वृत्तसंस्था)


त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ०६/२०१६ असा या एफआयआरचा क्रमांक असून यात हल्ल्याबाबत अज्ञात लोकांविरुद्ध पाकिस्तान दंड संहितेच्या ३०२, ३२४ आणि १०९ कलमान्वये तसेच दहशतवादविरोधी कायद्याच्या कलम ७ व २१-१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी वापरलेल्या टेलिफोन क्रमांकांचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे. या हल्ल्यामुळे भारत-पाक परराष्ट्र सचिव चर्चा पुढे ढकलावी लागली होती. तेव्हापासून आतापर्यंत या चर्चेची तारीख ठरू शकलेली नाही. हल्ल्यामागे पाकमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहंमदचा हात आहे, असे भारताने ठामपणे सांगितल्यानंतर पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी याबाबत चौकशी करण्यासाठी पंजाब सीटीडीचे अतिरिक्त महानिरीक्षक राय ताहिर यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय चौकशी पथक स्थापन केले होते. याच पथकाच्या शिफारशीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एफआयआर दाखल झाल्यानंतर भारताकडून हल्ल्याबाबत आणखी माहिती मागवली जाईल, असे पाकच्या पंजाब प्रांतातील विधिमंत्री राणा सनाउल्ला यांनी शुक्रवारी सांगितले. ते लाहोर येथे पत्रकारांशी बोलत होते. या एफआयआरमधून पाकची दहशतवादाविरुद्धची बांधिलकी प्रदर्शित होते. या हल्ल्यात अझहरचा हात असल्याचे आढळून आले तर निश्चितपणे त्याच्यावरही खटला चालविला जाईल, असेही ते म्हणाले. पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानने नोंदविलेल्या एफआयआरमध्ये जैश- ए- मोहम्मद ही अतिरेकी संघटना किंवा या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याचे नाव समाविष्ट न केल्यामुळे भारताने शुक्रवारी आपली नाराजी व्यक्त केली.

Web Title: Pathankot; An FIR has been registered in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.