पठाणकोट; पाकला हवेत आणखी पुरावे
By admin | Published: February 2, 2016 02:28 AM2016-02-02T02:28:25+5:302016-02-02T02:28:25+5:30
पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या चौकशी यंत्रणांनी काहीही प्रगती केलेली नाही
लाहोर : पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या चौकशी यंत्रणांनी काहीही प्रगती केलेली नाही, पाकिस्तानला भारताकडून आणखी पुरावे हवे आहेत, असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पठाणकोट हल्ल्याबाबतची चौकशी लवकरच जाहीर करण्याचे आश्वासन शनिवारी दिले होते. चौकशीत प्रगती करण्यासाठी भारताकडून आम्हाला आणखी पुरावे हवे आहेत, कारण चौकशी पुढे सरकलेली नाही व आता चेंडू भारताच्या कोर्टात आहे, असे या सूत्रांनी म्हटले.
भारत सरकारने जे पाच दूरध्वनी क्रमांक पाकला दिले होते त्याची चौकशी जवळपास पूर्ण झाली आहे. हे क्रमांक नोंदणी नसलेले असल्यामुळे त्यांच्या चौकशीतून काही हाती लागलेले नाही, शिवाय ते मिळविण्यासाठी दाखविलेल्या ओळखीही बनावट आहेत, असे सांगून या सूत्रांनी चौकशी पुढे जात नसल्याचे म्हटले. (वृत्तसंस्था)