हृदय शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने धरला ठेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 02:43 AM2017-06-24T02:43:09+5:302017-06-24T02:43:09+5:30
एखादा रुग्ण नृत्य करून लोकांचे मनोरंजन करीत असल्याचे दृश्य तुम्ही कधीही पाहिले नसेल. अमेरिकेच्या मेरीलॅण्ड येथील एका रुग्णालयात मात्र ते पाहावयास मिळाले
वॉशिंग्टन : एखादा रुग्ण नृत्य करून लोकांचे मनोरंजन करीत असल्याचे दृश्य तुम्ही कधीही पाहिले नसेल. अमेरिकेच्या मेरीलॅण्ड येथील एका रुग्णालयात मात्र ते पाहावयास मिळाले. हृदय रुग्ण पलंगावर पहुडल्या पहुडल्या नृत्य करू लागल्यामुळे रुग्णालयातील वातावरणाचा नूरच पालटला. १५ वर्षांच्या अमारी हॉलवर काही दिवसांपूर्वीत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एवढी मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर लोक खूप गंभीर राहतात; परंतु अमारीसाठी हा एकदम वेगळा अनुभव होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, शुद्धीवर येताच आपण नृत्य करू लागू हे अमारीला ठाऊक होते. जवळच उभ्या असलेल्या एका महिलेने अमारीच्या नृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर धूम करीत आहे. फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर तो २५ हजार लोकांनी पाहिला आहे. मुलाच्या शस्त्रक्रियेमुळे मी खूप दु:खी होते. त्याची तीनवेळा हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे यावेळी सर्व जण घाबरलेले होते, असे अमारीच्या आईने सांगितले. सध्या अमारी खुश आहे. त्याने आनंद व्यक्त करण्यासाठी नृत्य केले. त्याच्यासोबत काही डॉक्टरांनीही ठेका धरला होता.