आशिया खंडातील या चार देशांना लॉकडाऊन हटवणे पडले महागात, तर पुन्हा एकदा कोरोनाने घातले थैमान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:12 PM2020-05-30T12:12:40+5:302020-05-30T12:13:16+5:30
योग्य काळजी घेतली तर कोरोनाची लागण होणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या देशात लॉकडाऊन हटवण्यात आले.
कोरोनाचा संसगर्ग टाळण्यासाठी अख्या जगासमोर लॉकडाऊन हाच एक पर्याय होता. संक्रमण रोखण्यासाठी जगात परिस्थितीनुसार लॉकडाऊन लावण्यात आले. असंख्य लोक घरात बंदिस्त झाले. मात्र किती दिवस असे घरात बसणार? त्यामुळे कोरोनाला न घाबरता त्याच्यासह जगण्याची सवय लावावीच लागणार आणि म्हणून विविध उपायांनुसार खबरादारी पाळण्यात आली. योग्य काळजी घेतली तर कोरोनाची लागण होणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या देशात लॉकडाऊन हटवण्यात आले. मात्र अतिघाई संकटात नेई असाच काहीसे आशिया खंडातील या देशांमध्ये घडले. परिणामी कोरोना आटोक्यात आणता आणता रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांना पुन्हा एकदा कोरोनाने धडकी भरवली आहे.
इंडोनेशिया
मेच्या सुरुवातीपर्यंत इंडोनेशियाने कोरोनावर नियंत्रण मिळवले होते, मात्र मे महिना संपता संपता दुर्गम बेट मालुकूपर्यंत कोरोना पाेहोचला. येथील लोकांची ये-जा जावा आणि बालीसारख्या भागातही आहे. यामुळे तेथेही धोका वाढला आहे. मेच्या पहिल्या आठवड्यात देशात १२ हजार बाधित होते, जे गुरुवारी वाढून २४५३८ झाले.
श्रीलंका
५२ दिवसांच्या लॉकडाऊननंतर श्रीलंकामध्येही पुन्हा जनजीवन सुरू झाले. ११ मेपासून तेथील बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या. मात्र कुवेतहून परतलेले २५० जण पॉझिटिव्ह आढळल्याने रविवारपासून लॉकडाऊनचे काही नियम पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
फिलिपिन्स
फिलिपिन्समध्ये लॉकडाऊनचे नियम सर्वात कडक होते. संक्रमण रोखण्यासाठी घरातच बसा असे वारंवार नागिरकांना सांगून देखील विनाकारण बाहेर पडत होते. देशात एवढे कडक वातावरण होते की, राष्ट्रपती दुतेर्ते यांनी सांगितले होते, एखाद्याने लॉकडाऊन तोडल्यास त्याला गोळी घाला. शेवटी किती दिवस लॉकडाऊन वाढवणार, लॉकडाऊन वाढवणे म्हणजे आर्थिक परिस्थिती धोक्यात घालण्यासारखे होते म्हणून ११ मे रोजी मनिला विमानतळ आणि १६ मे रोजी मेट्रो व काही मॉल उघडण्यात आले. शुक्रवारपासून अंतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली. यामुळे देशभरात रुग्ण वाढू लागले.