दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेच्या विमानवाहू जहाजांची गस्त, चीन संतप्त
By admin | Published: February 19, 2017 04:39 PM2017-02-19T16:39:00+5:302017-02-19T16:39:00+5:30
अमेरिकेच्या नौदलानं दक्षिण चिनी समुद्रात विमानवाहू जहाजांद्वारे गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 19 - दक्षिण चीन समुद्रातील अतिक्रमणावरून चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावर अनेक देशांनी विरोध दर्शवला असतानाच आता अमेरिकेच्या नौदलानं दक्षिण चिनी समुद्रात विमानवाहू जहाजांद्वारे गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच चीननं अमेरिकेच्या दक्षिण चिनी समुद्रातील टेहळणीला विरोध केला आहे. दक्षिण चीन समुद्रात आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेला दिला आहे.
यूएसएस कार्ल विन्सन या लढाऊ विमानवाहू जहाजानं अमेरिकेनं दक्षिण चिनी समुद्रात शनिवारपासून गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. विन्सनच्या फेसबूक पेजवरच याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. स्ट्राईक ग्रुपचे कमांडर रिअर ॲडमिरल जेम्स किलबी म्हणाले, पॅसिफिक समुद्रातील प्रशिक्षण अमेरिकेच्या नौदलासाठी उपयुक्त आहे. इंडो-एशिया-पॅसिफिक या संपूर्ण भागातील मित्रांशी आम्हाला चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. वन चायना पॉलिसीच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालवला असल्यानेच अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा दक्षिण चिनी समुद्राच्या मालकी हक्कावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. तसेच या विषयावरून दोन्ही देशांतील संबंध अधिक बिघडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दक्षिण चिनी समुद्रात चीननं कृत्रिम बेट निर्माण केले असून, नौदलाचे प्रशिक्षण शिबिर सुरू केले आहे.
या दक्षिण चीनच्या बेटावरून चीनचा दरवर्षी 5 लाख कोटींचा व्यवहार होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होत असून, नैसर्गिक वायू, कच्चे तेलही उपलब्ध होते. ब्रुनेई, मलेशिया, फिलिपिन्स, तैवान, व्हिएतनाम या देशांचा दक्षिण चिनी समुद्रातील मालकी हक्कावरून वाद सुरू आहे. तसेच चीन या बेटाचा वापर लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी करत असून, इतर देशांच्या हद्दीत चीन अतिक्रमण करत असल्यानं अमेरिकेनं चीनला इशारा दिला आहे.