संगीत मैफलीत नरेंद्र मोदी यांचा शांतता संदेश
By admin | Published: September 29, 2014 06:02 AM2014-09-29T06:02:13+5:302014-09-29T06:02:13+5:30
येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित ग्लोबल सिटीझन्स महोत्सवाच्या मैफलीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले
न्यूयॉर्क : येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित ग्लोबल सिटीझन्स महोत्सवाच्या मैफलीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले व तेथील प्रमुख कलाकारांसोबत त्यांनी ६० हजारांच्या जमावाशी सहज संवाद साधला. युवकांच्या कॅन डू प्रवृत्तीचे त्यांनी खुल्या दिलाने कौतुक केले व युवकांत भारत बदलण्याची ताकद असल्याचे सांगितले.
पांढराशुभ्र कुडता व निळे नेहरू जाकीट या पोशाखात सेंट्रल पार्कच्या सभेत आलेल्या मोदी यांनी सात मिनिटे इंग्रजीत भाषण केले. हाऊ आर यू डुइंग न्यूयॉर्क असा प्रश्न विचारून ते म्हणाले, युवकांना बंद सभागृहात न भेटता मोकळ्या उद्यानात भेटण्याची संधी मिळाल्यामुळे मी खुश आहे.
जे झेड, बियॉन्स व इतर गायकांची गाणी चालली असताना नरेंद्र मोदी यांना कलाकार ह्यू जॅकमन याने व्यासपीठावर आणले. एकेकाळी चहाविक्रेता असणारे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले आणि आता ते भारताचे पंतप्रधान आहेत अशी ओळख जॅकमन यांनी करून देताच यांनी बहुतांश अमेरिकन असणाऱ्या ६० हजार श्रोत्यांना नमस्ते म्हणून अभिवादन केले. सात मिनिटांच्या इंग्रजी भाषणातच त्यांनी संस्कृत भाषेतील शांततेचा श्लोक सादर केला. टाळ्यांच्या कडकडाटात या भाषणाचे स्वागत झाले , हा कार्यक्रम टीव्ही, लॅपटॉप, टॅब्लेट व संगणकावर पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही त्यांनी अभिवादन केले. अमेरिकेतील संगीत मैफलीत सामाजिक संदेश देणारे मोदी हे पहिले भारतीय नेते ठरले आहेत.
तुम्ही भविष्य आहात, आज तुम्ही जे करता आहात त्यावर तुमचे भवितव्य ठरणार आहे. मला उद्यानात जमलेला हा युवकांचा जमाव पाहून आशा वाटू लागली आहे. तुमच्यात मला आश्वासक भविष्य दिसते आहे, तुम्हाला माझा सलाम. मला तुमचा, प्रत्येकाचा अभिमान वाटतो, तुमचे कुटुंबिय, मित्र, तुमचा देश यांनाही तुमचा अभिमान वाटत असेल, असे मोदी म्हणाले. गरिबीचे उच्चाटन, सर्वांना शिक्षण व स्वच्छता या मूल्यासाठी काम करणाऱ्या ग्लोबल सिटीझन मूव्हमेंटची मोदी यांनी प्रशंसा केली. काही जणांना वाटते की वृद्ध व्यक्तींच्या ज्ञानामुळे जग बदलते पण माझ्या मते तरुणांचा आदर्शवाद, संशोधकवृत्ती व काहीही करून दाखविण्याची कॅन डू ही प्रवृत्ती अधिक ताकदवान आहे, असे मोदी यांनी या भाषणात सांगितले. (वृत्तसंस्था)