Pegasus Exposed Story: सौदी महिलेचा आयफोन हॅक झाला, अन् जगात भूकंप आला, भल्याभल्यांची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 03:10 PM2022-02-18T15:10:14+5:302022-02-18T15:10:34+5:30
एनएसओ ग्रुपचे पेगासस (Pegasus) स्पायवेअर सॉफ्टवेअर खूप चर्चेत आले आहे. भारत सरकारवरही मोठमोठ्या नेत्यांचे फोन हॅक केल्याचा आरोप होत आहे. परंतू, हे सॉफ्टवेअर सौदीच्या एका महिलेमुळे उघड झाले आणि अख्ख्या जगाची झोप उडाली.
एनएसओ ग्रुपचे पेगासस (Pegasus) स्पायवेअर सॉफ्टवेअर खूप चर्चेत आले आहे. भारत सरकारवरही मोठमोठ्या नेत्यांचे फोन हॅक केल्याचा आरोप होत आहे. परंतू, हे सॉफ्टवेअर सौदीच्या एका महिलेमुळे उघड झाले आणि अख्ख्या जगाची झोप उडाली. आता इस्त्रायलच्या NSO Group समोरील संकटे वाढू लागली आहेत. कारण यावर आता वॉशिंग्टनमध्ये कायदेशीर कारवाई आणि तपास सुरु झाला आहे.
हेरगिरी करणाऱ्या सॉफ्टवेअरची एक चूक झाली आणि ती या महिलेने पकडली. महिला अॅक्टिव्हिस्ट लौजेन अल हाथलाऊल या महिलेला या स्पायवेअरचा एक फोटो तिच्या मोबाईलमध्ये मिळाला, तेव्हा तिला तिचा मोबाईल हॅक झाल्याचा संशय आला. तिच्या मोबाईलमध्ये स्पायवेअरने एक फोटो स्टोअर केला होता. तो स्पायवेअरकडून डिलिट करणे राहून गेले आणि सारा खेळ उघड झाला. यानंतर झालेल्या तपासाने NSO Group आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला आहे.
Al-Hathloul या सौदी अरेबियाच्या एक प्रसिद्ध समाजसेविका आहेत. सौदीमध्ये आज महिलांना वाहने चालविण्यास मिळत आहेत, त्या यांच्यामुळेच. या आंदोलनाला अल हाथलाऊल यांनीच सुरुवात केली होती. त्यांना य़ासाठी तुरुंगवासही झाला होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांची सुटका झाली होती. तेव्हाच सौदीच्या राजाने महिलांना वाहन चालविण्यास परवानगी दिल्याची घोषणा केली होती.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 6 महिन्यांपर्यंत आयफोनचे रेकॉर्ड तपासल्यानंतर सिटीझन लॅबचे संशोधक बिल मार्कझाक यांनी सांगितले की, त्यांच्या डिव्हाइसमध्ये एक पाळत ठेवणारे सॉफ्टवेअर होते. ते टार्गेटच्या डिव्हाइसवरून माहिती चोरते. Al-Hathloulयांच्यामुळे मोठा प्रकार उघड झाला. यामुळे अॅपलला शोध घेतल्यानंतर हजारो लोक या स्पायवेअरचे बळी पडल्याचे दिसले.