ट्रम्प-मस्क यांच्या धोरणांना लोक विटले: अमेरिकेत निघाले १२०० मोर्चे; भडका उडण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:45 IST2025-04-07T10:45:22+5:302025-04-07T10:45:47+5:30
‘हँड्स ऑफ’ आंदोलनातून हजारो निदर्शक, १५० हून अधिक संघटना रस्त्यांवर, महासत्तेतील सर्वांत मोठी निदर्शने; बदल केला नाही तर भडका उडण्याची शक्यता.

ट्रम्प-मस्क यांच्या धोरणांना लोक विटले: अमेरिकेत निघाले १२०० मोर्चे; भडका उडण्याची शक्यता
वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना विरोध म्हणून अमेरिकेत विविध राज्यांत हजारो निदर्शक रस्त्यांवर उतरले असून, ‘हँड्स ऑफ’ आंदोलनातून देशभर १२०० ठिकाणी शनिवारी भव्य मोर्चे काढण्यात आले. ५० राज्यांत हा असंतोष असून, या मोर्चांत १५० हून अधिक संघटना उतरल्या आहेत.
ट्रम्प यांनी प्रशासकीय क्षमतावृद्धीसाठी स्थापन केलेल्या ‘डोज’चे प्रमुख म्हणून इलॉन मस्क यांची नेमणूक केली. या माध्यमातून कर्मचारी कपात, अनेक नागरिकांची देशातून हकालपट्टी आणि इतर वादग्रस्त निर्णय घेतले जात आहेत. ज्या स्रोतांवर हक्कच नाही अशा क्षेत्रावर ताबा मिळवला जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
अमेरिकेतील १५०हून अधिक संघटना सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या असून, यात सिव्हिल राइटस् ऑर्गनायझेशन, लेबर युनियन व अनेक दिग्गजांचा समावेश आहे. हे आंदोलन २०१७मधील महिला मोर्चा व २०२० मधील ब्लॅक लाईव्हज् मॅटर विरोधातील निदर्शनासारखे मानले जाते. ट्रम्प यांनी आपल्या धोरणांत बदल केले नाहीत तर हा विरोध अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
'हँड्स ऑफ' या आंदोलनात बॉस्टन, शिकागो, लॉस एंजल्स, न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीसह इतर शहरांमध्ये मोठ्या संख्येने लोकांची गर्दी पाहायला मिळाली. ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणातील बदलांचा निषेध करत त्यांनी, हँड्स ऑफ कॅनडा, हँड्स ऑफ ग्रीनलँड, हँड्स ऑफ युक्रेन अशा घोषणा दिल्या. ‘डिअर रिपब्लिकन्स डू युवर जॉब’, ‘इम्पॅच ट्रम्प’ अशा आशयाचे फलक हाती घेत निदर्शने करण्यात आली.
काही देश आक्रमक, काही चर्चेच्या तयारीत
ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफवरून चीन आणि कॅनडासारख्या देशांनी प्रत्युत्तरादाखल कारवाईची घोषणा करून व्यापारयुद्ध छेडण्याची तयारी केली आहे. तर, तैवान, इंडोनेशियायारख्या देशांनी आपण अमेरिकेतून आयात वस्तूंवर कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याचे जाहीर करून थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे. ५०हून अधिक देशांनी अमेरिकेशी व्यापारविषयक चर्चेसाठी व्हाईट हाऊसशी संपर्क साधला आहे. याबाबत ब्रिटनने आपल्या अर्थव्यवस्थेच्या रक्षणार्थ ठोस पावले उचलण्यात येतील, असे म्हटले आहे. तर, इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेत्यान्याहू टॅरिफवर चर्चा करण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत.
मस्क यांच्यावरील आरोप
इलॉन मस्क आपल्या व्यावसायिक लाभासाठी जनतेच्या हिताशी खेळत आहेत. ‘डोज’ अर्थात डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशिएन्सीची जबाबदारी स्वीकारताच मस्क यांनी जनहिताशी खेळ चालविल्याचा नागरिकांचा
आरोप आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हुकूमशाहीला वैतागले
सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, लोकशाही संस्थांचे रक्षण, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येत केली जात असलेली कपात व विदेशी नागरिकांची हकालपट्टी या धोरणात ट्रम्प यांनी हुकूमशाही चालवल्याचा आरोप आहे.
हाती सरकारविरोधी फलक घेऊन विरोध
अमेरिकेतील मिडटाऊनपासून अगदी अलास्कापर्यंत सर्वच शहरांत नागरिकांचा हा असंतोष दिसून आला. हजारो निदर्शक रस्त्यावर उतरून हाती निषेधाचे फलक घेत विरोध करताना दिसले. या नागरिकांचा मुख्य रोष ट्रम्प व मस्क यांच्या विरोधात होता. आरोग्यविषयक निधीमध्ये कपात केल्याचा आरोप या नागरिकांनी ट्रम्प प्रशासनावर केला आहे.