China: पोरं जन्माला घालणंही चीनच्या नागरिकांसाठी बनलीय डोकेदुखी; नेमका काय झालाय प्रॉब्लेम?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:27 AM2021-06-03T08:27:17+5:302021-06-03T08:43:23+5:30
Three-Child Policy in China: येणाऱ्या काळात आर्थिक नुकसान आणखी होईल या भीतीने युवक या निर्णयाबद्दल फारसे उत्सुक नसल्याचं दिसून येत आहे.
बीजिंग – चीन(China) ने घटती लोकसंख्या लक्षात घेता विवाहित जोडप्यांना ३ मुलं जन्माला घालण्याची परवानगी दिली आहे. परंतु महागाईमुळे याचा काहीही फायदा होणार नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महागाईचा हवाला देत चीनच्या युवकांनी आम्ही यासाठी तयार नाही असं म्हटलं आहे. चीनच्या ताज्या जनगणनेनुसार मुलांचा जन्म आणि वृद्धांची संख्या पाहता नवी रणनीती तयार केली आहे.
चीनने भलेही त्यांच्या नागरिकांना ३ मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली असली तरी आर्थिक कारणामुळे मुलांचा सांभाळ आणि देखभाल करणं युवकांसाठी कठीण आहे. येणाऱ्या काळात आर्थिक नुकसान आणखी होईल या भीतीने युवक या निर्णयाबद्दल फारसे उत्सुक नसल्याचं दिसून येत आहे. चीनमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये सुविधा पुरवल्या जातात परंतु वस्तूस्थिती अशी आहे की, या हॉस्पिटलची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे महिलांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावं लागतं.
प्रसुतीपूर्व ते प्रसुतीपर्यंत जवळपास १ लाख युआन म्हणजे ११.५० लाखापर्यंत खर्च होतो. प्रसुतीनंतर घरात मदतनीस याच्यावर १५ हजार युआन म्हणजे २ लाखापर्यंत खर्च होतो. इतकचं नाही तर बीजिंगच्या उच्चस्तरीय परिसरात प्रति चौरस मीटर किंमत ९० हजार युआन आहे. म्हणजे प्रति चौरस मीटर १० लाख रुपये आहे. हाईडियनसारख्या क्षेत्रात शाळेय शिक्षणासाठी व्यवस्था चांगली आहे. त्यामुळे बरेच पालक याठिकाणीच राहण्याचा प्रयत्न करतात.
पगार ५.५० लाख अन् मुलांवर खर्च ७० टक्के
२०१९ मध्ये शांघाय अकादमी ऑफ सोशल सायन्सने दिलेल्या रिपोर्टमध्ये एका कुटुंबाला मुलांच्या १५ वर्षापर्यंत सरासरी ८ लाख ४० हजार युआन म्हणजे जवळपास १ कोटी रुपये खर्च करावे लागतात. वयाच्या १५ वर्षापर्यंत एका मुलाच्या शिक्षणावर सरासरी ६० लाख रुपये खर्च होतो. शांघायच्या जिंगान आणि मिन्हांगसारख्या उपनगरी भागात एका कुटुंबाचे सरासरी उत्पन्न ५.५० लाखांपेक्षाही कमी आहे. तिथे मुलांवर ७० टक्के खर्च केले जातात. महागाई पाहता पालक एकाच मुलाला जन्म देण्याचं धाडस करतात. त्याला चांगली जीवनशैली देण्यासाठी ते खूप खर्च करतात. लहान मुलांसाठी लागणारं बेबी फूड न्युझीलंड अथवा ऑस्ट्रेलियातून मागवलं जातं. मुलांना पियानो, टेनिस आणि बुद्धिबळ खेळण्यासाठी क्लासेसला पाठवलं जातं.