दिल्लीवासीयांनी अक्कल नसलेल्या माणसाला मतदान केले, शाहीद आफ्रिदी बरळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 01:08 PM2019-05-27T13:08:19+5:302019-05-27T16:08:04+5:30
क्रिकेटपासून काश्मीरप्रश्नापर्यंत सातत्याने भारतविरोधी वक्तव्ये करणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे.
इस्लामाबाद - क्रिकेटपासून काश्मीरप्रश्नापर्यंत सातत्याने भारतविरोधी वक्तव्ये करणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे. सोशल मीडियावर शाहिद आफ्रिदीला सतत झोडपून काढणारा भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने आफ्रिदीचा तीळपापड झाला आहे. दिल्लीतील मतदारांनी अक्कल नसलेल्या माणसाला निवडून दिले आहे, अशी आगपाखड आफ्रिदीने केली आहे.
काही वर्षांपूर्वी क्रिकेटचे मैदान गाजवणारा भारताचा डावखुरा सलामीवीर गौतम गंभीर याने राजकारणाच्या मैदानातही यशस्वीरीत्या पदार्पण केले आहे. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून गंभीरने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. दरम्यान, गांभीरच्या विजयामुळे एकेकाळी त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या शाहीद आफ्रिदीचा तीळपापड झाला आहे.
दिल्लीमधून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या गौतम गंभीरवर टीका केली आहे. दिल्लीतील मतदारांनी अक्कल नसलेल्या माणसाला मतदान केले आहे, असे वक्तव्य आफ्रिदीने पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत. तसेच विश्वचषकातही पाकिस्तानविरोधात सामना खेळू नये असे गंभीरने म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आफ्रिदीने हे वक्तव्य केले. ''असे विधान गौतम गंभीरने केले असेल तर त्याच्या अकलेवरून वाटतं का त्याने कुठली शहाणपणाची गोष्ट केली आहे, असे वाटते का? सुशिक्षित लोक अशी वक्तव्ये करतात का? त्याने केलेले वक्तव्य मुर्खपणाचे आहे आणि लोकांनी अशा व्यक्तीला मतदान केले आहे, ज्याला अक्लल नाही आहे.
Shahid Afridi responds to Gautam Gambhir's suggestion that India should forfeit any World Cup matches versus Pakistan "Does this look like something which a sensible person would say? Do educated people talk like this?" #CWC19pic.twitter.com/wYgtoOMI5k
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) May 24, 2019
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान विश्वचषकामध्ये 16 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. विश्वचषकात याआधी झालेल्या सहा लढतींमध्ये भारताने पाकिस्तानला मात दिली आहे. त्यामुळे आता यावेळच्या लढतीत काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.