कोरोनाच्या भीतीनं समुद्रात उड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 07:47 PM2020-04-18T19:47:06+5:302020-04-18T19:47:31+5:30

इंडोनेशियात बोटीतील कर्मचार्‍यांमुळे आपल्यालाही कोरोना होईल या भीतीनं शेवटी अनेक प्रवाशांनी थेट समुद्रातच उड्या घेतल्या.

People jumped into the sea for fear of Corona! | कोरोनाच्या भीतीनं समुद्रात उड्या!

कोरोनाच्या भीतीनं समुद्रात उड्या!

Next
ठळक मुद्देकोरोना तर अनेकांचा जीव घेतोच आहे, पण त्याची भीतीही अनेकांचं आयुष्य संपवतं आहे!.

लोकमत न्यूज नेटवर्क
सध्याच्या काळात प्रत्येकाला आपलं घर प्यारं झालं आहे. स्वत:ची प्रगती व्हावी, विकास व्हावा म्हणून अनेकांनी आपापला प्रदेश सोडून कामधंद्यासाठी दुसरीकडे सहारा शोधला होता, पण कोरोनाच्या महामारीनं सगळ्यांनाच देशोधडीला लावलं आणि आपलं किडुकमिडुक आवरून त्यांना पुन्हा आपापल्या घरी जाण्यास भाग पाडलं. स्थलांतरितांसाठी तर हा अक्षरश: जीवनमरणाचा प्रo्न. त्यामुळे ठिकठिकाणच्या स्थलांतरितांनी झपाट्यानं आपल्या देशाचा, गावाचा रस्ता धरला.
इंडोनेशिया हा एक मोठा द्वीपसमूह. कोरोनाचं संकट वाढायला लागलं तसं, त्यांचा शेजारी देश मलेशियानंही आपल्याकडे लॉकडाऊन केलं. हजारो कामगार बेकार झाले. त्यामुळे मलेशियात असलेल्या इंडोनेशियन नागरिकांनीही आपल्या मायदेशी जाण्याचं ठरवलं. फेरी बोटींनी काही जण आपल्या देशात पोहोचलेही. पण हा प्रकार इंडोनेशिया प्रशासनाला कळल्यावर तेही सज्ज झाले. त्यात एका बोटीतील तीन क्रू मेंबर्सना कोरोना झालेला असल्याची माहिती त्यांना मिळाली. या बोटीत अडीचशेवर प्रवासी होते. तोपर्यंत प्रवाशांनाही ही माहिती नव्हती. इंडोनेशियन प्रशासनानं किनार्‍याच्या अलीकडेच ही बोट थोपवली. आपल्याला आता परत फिरावं लागेल, किनार्‍यावर उतरू देणार नाहीत आणि बोटीतील कर्मचार्‍यांमुळे आपल्यालाही कोरोना होईल या भीतीनं शेवटी अनेक प्रवाशांनी थेट समुद्रातच उड्या घेतल्या. काहींनी बोटीत होती तेवढी लाइफ जॅकेट्स उचलली तर काहींनी तशाच उड्या  मारल्या. त्यातले काही जण किनार्‍याला लागले, तर काही जणांचा अद्याप पत्ता नाही. कोरोना तर अनेकांचा जीव घेतोच आहे, पण त्याची भीतीही अनेकांचं आयुष्य संपवतं आहे!.

Web Title: People jumped into the sea for fear of Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.