रशियाच्या आकाशात दिसले UFO! विमान वाहतूक पूर्ण बंद, 200km पर्यंत लढाऊ विमानांनी घेतला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 04:43 PM2023-03-03T16:43:12+5:302023-03-03T16:44:27+5:30
रशियाच्या आकाशात एक 'यूएफओ' सारखं यान दिसून आळं आहे. रशियन नागरिकांनी याची माहिती दिल्यानंतर सरकारनं तातडीनं देशातील सर्व विमान वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
रशियाच्या आकाशात एक 'यूएफओ' सारखं यान दिसून आलं आहे. रशियन नागरिकांनी याची माहिती दिल्यानंतर सरकारनं तातडीनं देशातील सर्व विमान वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. ही घटना रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात घडली आहे. पुढील आदेश येईपर्यंत येथील सर्व उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. आकाशात ड्रोनसारखी वस्तू शहराच्या दिशेने येत असल्याचे सांगितले जात आहे.
रशियन सरकारी न्यूज एजन्सी TASS नुसार, पुलकोवोपासून २०० किलोमीटरपर्यंतचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत उड्डाणांची ही स्थगिती कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, उड्डाणे बंद करण्याचे कोणतेही कारण प्रशासनाने जाहीर केलेले नाही.
फ्लाइट रडार वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सेंट पीटर्सबर्गच्या दिशेने निघालेली अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. 'सेंट पीटर्सबर्गपासून १८० किलोमीटर अंतरावर एक अज्ञात वस्तू हवेत उडताना दिसली. ती एका लष्करी क्षेत्राजवळ दिसून आली आहे. त्यामुळे पुलकोवो विमानतळावरील सर्व उड्डाणं बंद करण्यात आली आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेवरून ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
न्यूजवीक वेबसाइटनुसार, शहरावर एक "यूएफओ" दिसला आहे. शहराजवळ एक अज्ञात वस्तू दिसल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी "कार्पेट" प्लान सुरू केला आहे. कोणतीही अज्ञात वस्तू दिसल्यावर हा प्लान योजला जातो. यात लढाऊ विमाने तपासासाठी पाठवण्यात आली होती. पण यात अद्याप काहीही निष्पन्न झालेले नाही.