अमेरिकेत संचारबंदी मोडून लोक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 03:29 AM2020-08-28T03:29:00+5:302020-08-28T03:29:37+5:30
बुधवारी सलग तिसऱ्या रात्री लोकांनी संचारबंदी तोडून रस्त्यावर आंदोलन केले. शेकडो लोकांच्या हातात फलक होते.
केनोशा : कृष्णवर्णीय व्यक्ती जेकब ब्लेक याच्यावर एका पोलिसाने केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ अमेरिकेच्या विस्कोन्सिन राज्यातील केनोशा शहरात बुधवारी सलग तिसऱ्या रात्री हजारो लोक संचारबंदी तोडून रस्त्यावर उतरले.
जेकब ब्लेक याच्यावर रविवारी एका श्वेतवर्णीय पोलिसाने गोळीबार केला होता. तेव्हापासून लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करीत आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी रात्रीची संचारबंदी लावली आहे. तथापि, लोक संचारबंदी मोडून रस्त्यावर उतरत आहेत.
बुधवारी सलग तिसऱ्या रात्री लोकांनी संचारबंदी तोडून रस्त्यावर आंदोलन केले. शेकडो लोकांच्या हातात फलक होते. जेकब ब्लेकला न्याय देण्याची मागणी त्यात करण्यात आली. ‘न्याय नाही, तर शांतीही नाही’ अशा अर्थाचे फलक मोठ्या प्रमाणावर दिसून आले. जेकब ब्लेक याच्यावरील गोळीबाराच्या निषेधार्थ उसळलेल्या आंदोलनाचे लोण अमेरिकेतील लॉस एंजेलिस आणि मिनियापोलीस यासह अनेक शहरांत पसरले आहे. आंदोलनाला पाठिंबा म्हणून मिलवॉकी शहरातील बास्केट बॉल संघ ‘मिलवॉकी बक्स’ने बुधवारी सामन्यांवर बहिष्कार घातला.
मैत्रिणीने केली होती तक्रार
जेकब हा एका मैत्रिणीच्या घरी गेला होता. दोघांत वाद झाला. त्यावरून मैत्रिणीने पोलिसांना बोलावले. पोलिसांसोबतही त्याचा वाद झाला. तो आपल्या गाडीचा दरवाजा उघडत असताना एका पोलिसाने गोळीबार केला.