अपत्य असणारे लोक अधिक जगतात
By admin | Published: March 16, 2017 12:58 AM2017-03-16T00:58:17+5:302017-03-16T00:58:17+5:30
मुले असल्यास तुमचे आयुष्य दोन वर्षांनी वाढते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.
लंडन : मुले असल्यास तुमचे आयुष्य दोन वर्षांनी वाढते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.
मुले आणि मुली पालकांची मने सक्रिय ठेवण्यासह उतारवयात त्यांची अतिरिक्त काळजी घेतात. त्यामुळे मुले असणारे लोक मुले नसणाऱ्यांच्या तुलनेत अधिक जगतात, असे संशोधकांनी सांगितले. संशोधकांनी ७०४४८१ पुरुष आणि ७२५२९० महिलांची वैवाहिक स्थिती, त्यांच्या अपत्यांची संख्या आणि अपत्यांचे लिंग यांचे विश्लेषण करून वरील निष्कर्ष काढला. अपत्य असलेल्या ६० वर्षीय व्यक्तीचे उर्वरित आयुर्मान निपुत्रिक व्यक्तींच्या तुलनेत जवळपास एक वर्ष १० महिन्यांनी अधिक म्हणजे २०.२ वर्ष होते. याचाच अर्थ असा की मुलेबाळे असलेल्या व्यक्ती १ वर्ष १० महिने अधिक जगतात. महिलांच्या बाबतीत हा फरक २४.६ वर्ष आणि २३.१ वर्ष म्हणजेच दीड वर्षाचा आहे. ६० वर्षांच्या वयाच्या निपुत्रिक व्यक्तीचे वर्षभरात मृत्यू येण्याचे प्रमाण अपत्य असलेल्या व्यक्तींहून ०.०६ टक्क्यांनी अधिक होते. अपत्य असलेल्या आणि निपुत्रिक या दोन्ही व्यक्ती नव्वदीत गेल्यानंतर हा फरक १.४७ टक्क्यांनी वाढतो. या वयात ते पूर्णपणे त्यांच्या पुढील पिढीवर अवलंबून असतात. मुले असण्याचा दीर्घायुष्याशी निकटचा संबंध आहे, असे या अभ्यासाचे प्रमुख
डॉ. कारीन मोदिग यांनी सांगितले. गर्भारपणाचा महिलांच्या संप्रेरकांवर परिणाम होऊन त्यांना कर्करोगासह विविध आजार होण्याचा धोका कमी होतो, असेही ते म्हणाले.