किंग चार्ल्सला राजा म्हणून स्वीकारण्यास लोकांचा नकार, राजेशाही संपवण्याची मागणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 08:51 PM2022-09-14T20:51:10+5:302022-09-14T20:51:24+5:30
Britain News: क्वीन एलिझाबेथच्या मृत्यूनंतर चार्ल्स ब्रिटनचे राजे झाले आहेत, पण त्यांना विरोध होतोय.
लंडन: ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे 8 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मोठा मुलगा चार्ल्स तृतीय हे ब्रिटनचे महाराज झाले आहेत. एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, यातच चार्ल्स यांना राजा घोषित करण्याला अनेक ठिकाणी विरोध होत आहे. राणीच्या निधनानंतर संपूर्ण ब्रिटन शोकसागरात बुडाले आहे, पण त्यासोबतच राजा चार्ल्स यांना विरोध होतोय.
चार्ल्स यांना राजा करणे लोकशाहीच्या विरोधात असल्याचे लोकांचे म्हणने आहे. मात्र, विरोध करणारे तुलनेने फार कमी आहेत. एएफपीच्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये ज्या लोकांना राजेशाहीचा नकोय, ते अतिशय कमी आहेत. YouGov च्या सर्वेक्षणानुसार, 22 टक्के लोकांना देशाला निवडून आलेला राष्ट्रप्रमुख हवाय. तर, 66 टक्के लोकांना राजघराण्यातील व्यक्तीलाच प्रमुखपदी पाहायचे आहे.
राजघराण्याबद्दल संवेदना व्यक्त केल्यानंतर रिपब्लिकन चळवळ पुन्हा सक्रीय झाली आहे. सोमवारी एका भव्य समारंभात चार्ल्स यांना राजा घोषित करण्यात आले, तेव्हा ब्रिटनच्या संसदेसमोर एका महिलेला 'नॉट माय किंग'चा बोर्ड दाखवत विरोध केला. यावेळी पोलिसांनी त्या महिलेला अटक केली. लोकांच्या संमतीशिवाय राजा होणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. नव्या राजाची घोषणा हा लोकशाहीचा अपमान असल्याचे विरोधकांचे मत आहे.