कदाचित... हा पोपट बनणार खुनाचा साक्षीदार
By Admin | Published: June 27, 2016 03:02 PM2016-06-27T15:02:41+5:302016-06-27T15:02:41+5:30
एका विचित्र प्रकरणामध्ये खुनाचा साक्षीदार म्हणून चक्क पोपटाचा विचार केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
>ऑनलाइन लोकमत
मिशिगन (अमेरिका), दि. 27 - एका विचित्र प्रकरणामध्ये खुनाचा साक्षीदार म्हणून चक्क पोपटाचा विचार केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेतल्या मिशिगनमधली ही घटना आहे. ग्लेना ड्युरम या महिलेवर तिच्या पतीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये मार्टिन ड्युराम पाच गोळ्या लागल्याने मरण पावले होते. त्यांच्या खुनानंतर काही वेळातच एक व्हिडीयो काढण्यात आला होता, यामध्ये ड्यराम यांच्या घरात पाळलेला पोपट डोन्ट शूट असे म्हणताना रेकॉर्ड झालं आहे. या हत्येच्या काही आठवड्यांनंतर या हत्येचा एकमेव साक्षीदार असलेल्या या पोपटाने ड्युराम पती पत्नींमध्ये झालेला संवाद ऐकवल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. मार्टिन ग्लेनला घराबाहेर हाकलतो आणि त्यावर ग्लेन मी कुठे जाणार असा प्रतिप्रश्न करते. त्यानंतर मार्टिन डोन्ट शूट हे शेवटचे उद्गार म्हणतो असा त्याच्या कुटुंबियांचा दावा असून पोपटाने देखील हे शब्द उच्चारल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ज्यामुळे मार्टिनची हत्या ग्लेननेच केली असल्याचा त्यांचा आरोप आहे, असे वृत्त वूड टीव्हीने दिले आहे.
सरकारी वकिल पोपटाचे शब्द हा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतील का याचा कायद्याच्या दृष्टीकोनातून अभ्यास करत आहेत. तर ग्लेनानं मी माझ्या पतीला मारलेलं नाही, ही एकच गोष्ट वारंवार पोलीसांना सांगत आहे.
मी आफ्रिकन पोपटांचा अभ्यास करत असून खटल्यामध्ये या पोपटाच्या शब्दांचा किती उपयोग होईल याची चाचपणी करण्यात येत असल्याचे सरकारी वकिल रॉबर्ट स्प्रिंगस्टेड यांनी डेट्रॉइट फ्री प्रेसला सांगितले. तर, हा पक्षी ऐकलेलं जसंच्या तसं बोलू शकतो असा दावा मार्टिन ड्युरामची आई लिलियन यांनी केला आहे.
विशेष म्हणडे आर्थिक समस्येमुळे आपण आत्महत्या करत असल्याचे पत्र किंवा सुईसाइड नोट ग्लेन ड्युरामने तीन वेळा लिहिली आहे.