लोकांना व्यसनी बनविले, यूट्युब, मेटावर खटला; कॅनडातील एका व्यक्तीने घेतला पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:32 PM2024-08-12T12:32:12+5:302024-08-12T12:37:08+5:30
प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीचे नाव लॉ फर्म लॅम्बर्ट ॲव्होकॅट्सचे फिलिप ब्रॉल्ट आहे
टोरँटो: कॅनडातील माँट्रियल येथील एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक, यूट्यूब, रेड्डिट, इन्स्टाग्राम आणि फेसबुकविरुद्ध खटला दाखल केला आहे आणि तोही यासाठी की यामुळे लोकांना त्याचे व्यसनच लागत असून, त्याचा मानसिक आरोग्यावर खूप नकारात्मक परिणाम होत आहे. २४ वर्षीय याचिकाकर्त्याने सांगितले की, त्याने २०१५ मध्ये सोशल मीडिया वापरण्यास सुरुवात केली. दररोज चार तास ॲप्स वापरत असे. त्याचा परिणाम त्याच्या काम आणि झोपेवर झाला. यासंदर्भात त्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लॉ फर्म लॅम्बर्ट ॲव्होकॅट्सचे फिलिप ब्रॉल्ट यांनी माहिती दिली.
५२ % मुले ॲडिक्ट
७ ते ११ वयोगटातील ५२% कॅनडातील मुले सोशल मीडिया वापरतात आणि सोशल मीडिया चालकांनी वापरकर्त्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
५०० दशलक्ष वर्षांचा सोशल मीडिया वापर
- मनुष्य ५०० दशलक्ष वर्षे एवढा कालावधी सोशल मीडियावर व्यतीत करील, असा अंदाज २०२४ मध्ये वर्तवण्यात आला होता.
- यावरून लक्षात येते की, ही काही विशिष्ट व्यक्तींसाठी समस्या नाही, ती प्रत्येकासाठी एक मोठी समस्या आहे, ही एक सतत वाढत जाणारी समस्या असल्याने फर्मने खटला हाती घेतला, असे ब्रॉल्ट यांनी सांगितले.
मानसिकतेचा घेतात फायदा...
- या कंपन्यांच्या सोशल मीडिया व्यासपीठांच्या डिझाइनबाबत कथित निष्काळजीपणाबद्दल दंडात्मक नुकसान वसूल
- करण्याचे या प्रकरणाचे उद्दिष्ट आहे. वापरकर्त्यांच्या मानसिक कमकुवतपणाचा फायदा घेण्यासाठीच सोशल मीडियावरील कंटेंट विशिष्ट प्रकारे तयार केला जातो.
- त्यामुळे वापरकर्त्याच्या जीवनावर दीर्घकाळ व्यस्तता निर्माण होते. आम्ही प्रसार माध्यमांच्या सहकार्याने हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार करत आहोत. लोकांना सोशल मीडियाच्या वापरातील जोखीम समजून घेणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.