22 वर्षांपासून बेपत्ता होता व्यक्ती; शेजाऱ्याने गुगल अर्थच्या मदतीने शोधले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:56 AM2019-09-15T11:56:13+5:302019-09-15T11:56:45+5:30
मॉल्ट नोव्हेंबर 1997 मध्ये एका नाईट क्लबला गेला होता.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये 22 वर्षांपूर्वी एक 40 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाला होता. शोध घेऊनही तो सापडला नव्हता. मात्र, त्याला त्याच्या शेजाऱ्याने अपघाताने गुगल अर्थच्या साह्याने शोधले आहे.
विलियम मॉल्ट (40) असे बेपत्ता मृत 1997 मध्ये बेपत्ता झाला होता. त्याला शोधण्याचा प्रयत्न त्याचा शेजारी मित्र करत होता. सर्व प्रयत्न करून थकल्यानंतर तो गुगल अर्थ हाताळत असताना त्याला घराजवळ असलेल्या तलावामध्ये काहीतरी कारसारखी वस्तू बुडालेली दिसली. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी 28 ऑगस्टला या तलावातून पांढऱ्या रंगाची सेदान कार बाहेर काढली. कारमध्ये मानवी सांगाडा सापडला. हा सांगाडा मॉल्टचा होता.
मॉल्ट नोव्हेंबर 1997 मध्ये एका नाईट क्लबला गेला होता. तो मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतत होता. मात्र, तो घरी पोहोचू शकला नाही. जेव्हा मॉल्ट बेपत्ता झाला तेव्हा त्याच्या घराचे बांधकाम सुरू होते. सध्या मॉल्टच्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मी कधीही तलावाच्या पाण्यामध्ये अशी वस्तू पाहिली नाही. मला विश्वासच बसत नाहीय की तेथे 22 वर्ष जुनी कार असेल आणि त्यामध्ये शव असेल.