लंडन-दुबईमध्ये घर, बँकांमध्ये कोट्यवधी रुपये; परवेझ मुशर्रफ यांची संपत्ती किती होती पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 02:30 PM2023-02-05T14:30:54+5:302023-02-05T14:32:21+5:30
पाकिस्तानाचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांचं आज निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्यावर संयुक्त अरब अमिरातमधील (UAE) अमेरिकन रुग्णालयात उपचार सुरू होते. पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार ते अमाइलॉइडोसिस आजारानं ग्रस्त होते.
नवी दिल्ली-
पाकिस्तानाचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांचं आज निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्यावर संयुक्त अरब अमिरातमधील (UAE) अमेरिकन रुग्णालयात उपचार सुरू होते. पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार ते अमाइलॉइडोसिस आजारानं ग्रस्त होते.
मुशर्रफ यांनी १९९९ ते २००८ पर्यंत पाकिस्तानमध्ये लष्करप्रमूखपद भूषवलं. ते २०१६ सालापासून दुबईत वास्तव्याला होते. त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले. पाकिस्तानच्या नागरिकांचे पैसे हडपून मुशर्रफ यांनी परदेशात कोट्यवधींची संपत्ती जमा केल्याचा आरोप करण्यात आला. यातील काही संपत्ती त्यांच्या नावावर होती तर काही कुटुंबीयांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.
कोर्टानं दिले होते संपत्तीच्या चौकशीचे आदेश
एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी पाकिस्तानच्या अँटी टेररिझम कोर्टानं फेडरल इनव्हेस्टिगेटीव्ह एजन्सीनं मुशर्रफ यांच्या संपत्तीची माहिती जमा करण्याचे आदेश दिले होते. एफएआयनं आपल्या रिपोर्टमध्ये मुशर्रफ यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा खुलासा केला होता. या अहवालानुसार पाकिस्तानात परवेझ मुशर्रफ यांच्या आठ संपत्ती आहेत.
पाकिस्तानात किती संपत्ती?
कराचीमध्ये ५० लाखांचं घर, खायबान ए फैजल फेस-८ मध्ये १५ लाख रुपयांचा फ्लॅट, कराचीच्या डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटीमध्ये १५ लाख रुपये किमतीचा फ्लॅट, इस्लामाबादमध्ये ७.५ कोटी किमतीचा फ्लॅट, लाहोरमध्ये ६० लाख रुपये किमतीचा फ्लॅट आणि इस्लामाबादच्या शेहजादमध्ये ६० लाख रुपये किमतीचं फार्म हाऊस आहे.
परदेशातही कोट्यवधींची संपत्ती
परवेझ मुशर्रफ यांनी लंडन आणि दुबईमध्ये कोट्यवधींची संपत्तीची खरेदी केली होती. मुशर्रफ यांनी लंडनच्या आलिशान हाइड पार्क परिसरात फ्लॅट खरेदी केला होता. ज्याची किंमत २० कोटी रुपये इतकी होती. याशिवाय त्यांनी दुबईतही २० कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. एफएआयनं आपल्या रिपोर्टमध्ये मुशर्रफच्या जवळपास अर्धा डझनहून अधिक बँक खात्यांची माहिती सोपवली होती. ही बँक खाती पाकिस्तान आणि लंडनमधील आहेत. मुशर्रफ यांच्या परदेशी बँक खात्यांमध्ये जवळपास दोन कोटी डॉलर आणि पाकिस्तानातील बँकेत १२.५ लाख रुपये जमा आहेत.
निवृत्तीनंतर मिळाले होते २ कोटी रुपये
पाकिस्तानातील एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार २०२० साली परवेझ मुशर्रफ यांच्याबाबत मोठा खुलासा केला होता. मुशर्रफ यांना निवृत्तीनंतर दोन कोटी रुपये मिळाल्याचा दावा केला गेला होता. २०१३ मध्ये पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार मुशर्रफ यांनी लष्करातून निवृत्त होत असताना मिळालेलं घर आणि संपत्तीची विक्री केली नव्हती.