पाकच्या सर्वोच्च न्यायालयात जाधव यांना तात्काळ फाशी देण्यासाठी याचिका
By admin | Published: May 28, 2017 04:00 PM2017-05-28T16:00:38+5:302017-05-28T16:37:15+5:30
कुलभूषण जाधव यांना लवकरात लवकर फाशी देण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 28 - पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात भारतीय नागरिक असलेल्या कुलभूषण जाधव यांना लवकरात लवकर फाशी देण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत पाकिस्तानच्या कायद्याअंतर्गत जाधव प्रकरणात लवकरात लवकर फाशी देण्याच्या निर्णयावर अंमलबजावणी करावी, असं म्हटलं आहे. तसेच जाधव यांना फाशी देण्याच्या निर्णयात बदल न झाल्यास त्यांना लवकरात लवकर फाशी देण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करावे, असंही याचिकेत नमूद केलं आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र "डॉन"च्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील मुजामिल अली या व्यक्तीनं याचिका दाखल केली असून, तो स्वत: पेशाने वकील आहे. मुजामिल याच्या वतीनं अॅड. फारूख नाईक यांनी याचिका दाखल केली आहे. अॅड. फारूख नाईक हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आहेत. भारताच्या मागणीनुसार कुलभूषण जाधव यांना न्यायालयासमोर त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी वकीलही देण्यात आला होता, असा दावा याचिकाकर्त्यानं केला आहे. या याचिकेत प्रांतीय सरकार, अंतर्गत आणि कायदे सचिव, पाकिस्तान आर्मी अॅक्ट 1952च्या अंतर्गत स्थापन केलेल्या कोर्ट ऑफ अपीलला प्रतिवादी करण्यात आलं आहे.
या याचिकेत कुलभूषण जाधव यांच्या आईचा उल्लेख आहे. जाधव यांच्या आईने 26 एप्रिलला पीपीएच्या कलम 131 आणि 133 (बी) अंतर्गत एक याचिका दाखल केली होती. कलम 131नुसार, कोर्ट मार्शलने दिलेल्या निर्णयाने समाधान न झाल्यास ती व्यक्ती सरकार किंवा लष्करप्रमुखांकडे दाद मागू शकते. कलम 133 (बी) नुसार ज्या व्यक्तीला जन्मठेप अथवा फाशीची शिक्षा देण्यात आली आहे, ती व्यक्ती 40 दिवसांत या निर्णयाविरोधात दाद मागू शकते. पाकिस्तानविरोधात कट-कारस्थान रचणाऱ्या लोकांचा बदला घेण्याचा पाकिस्तानी नागरिकांना अधिकार असल्याचा दावाही याचिकाकर्त्याने केला आहे. भारताचा दावा आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाने केलेले दावे भारत-पाकमध्ये झालेल्या 2008च्या कराराचं उल्लंघन करणारे असून, एक प्रकारे हे व्हिएन्ना कराराचं उल्लंघनच आहे, असंही याचिकेत नमूद केलं आहे.