इंधन दरवाढीचा भडका! पाकिस्तानमधील जनता महागाईने बेजार; कराचीत पेट्रोल 200 पार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 08:41 AM2020-02-21T08:41:57+5:302020-02-21T08:45:19+5:30
पाकिस्तानमधील जनता महागाईने बेजार झाली आहे. पाकिस्तानची व्यापार राजधानी असलेल्या कराचीत पेट्रोलचा दर हा प्रति लिटर तब्बल 200 रुपये झाला आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूही मोठ्या प्रमाणात महाग झाल्या आहेत. गेल्या 12 वर्षांतील महागाईचा रेकॉर्ड इम्रान खान सरकारच्या काळात तुटला असून गव्हाचं पीठ, साखर यांचे भाव गगनाला भिडले आहेत. याच दरम्यान इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पाकिस्तानमधील जनता महागाईने बेजार झाली आहे. पाकिस्तानची व्यापार राजधानी असलेल्या कराचीत पेट्रोलचा दर हा प्रति लिटर तब्बल 200 रुपये झाला आहे.
पीएसओ (Pakistan State Oil) सह सर्व ऑईल मार्केटिंग कंपनीची टर्मिनल बंद झाल्याने कराचीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच कराचीतील पेट्रोल पंप चालकांनी 200 रुपयांनी पेट्रोल विकण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी विषारी वायूगळती झाली होती. याच कारणाने पाकिस्तान स्टेट ऑईलसहित सर्वच इंधन कंपन्यांचे टर्मिनल काही दिवसांसाठी बंद आहेत. कराची आणि सिंध प्रांतातील अनेक शहरात ही पेट्रोल दराचा भडका उडाला आहे.
इंधन पुरवठा काही दिवसांसाठी बंद असल्यामुळे शहरातील नागरिकांना पेट्रोल टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे पेट्रोल पंपचालकांनी या परिस्थितीचा फायदा उठवत दरात वाढ केली आहे. काही ठिकाणी पेट्रोल 160 ते 200 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर, काही पेट्रोल पंपचालकांनी आपले पेट्रोल पंप बंद ठेवले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही महिन्यांपूर्वी देशातील आर्थिक स्थिती लक्षात घेऊनच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटद्वारे लवकरच खाद्यपदार्थांचे दर कमी करण्यात येतील. सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
पाकिस्तानमधील कराची, लाहोर आणि इस्लामाबाद येथे गव्हाचे पीठ 70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे एका चपाती/भाकरीची किंमत 15 रुपये बनली आहे. तर, साखर 80 रुपये किलो झाली असून तिची निर्यात न थांबविल्यास साखर प्रति किलो 100 रुपये असा दर गाठू शकते. दरम्यान, ट्रान्सपोर्टर यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात केलेल्या आंदोलनामुळे या किंमती वाढल्याचं सांगितलं. तसेच त्याआधी टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. तब्बल 400 रुपये प्रति किलोने पाकिस्तानात टोमॅटो विकले गेले.
महत्त्वाच्या बातम्या
मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा
मुख्यमंत्री ठाकरे आज पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींना भेटणार
जगातील टॉप १०० विद्यापीठांमध्ये भारतातील अकरांचा समावेश
NZ vs IND : Virat Kohliच्या नावावर झाला नकोसा विक्रम; धोनी आहे यादीमध्ये अव्वल