Coronavirus: लहान मुलांसाठी संजीवनी! ‘या’ कंपनीची लस ठरणार अधिक प्रभावी, लवकरच मिळणार मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 09:33 AM2021-09-21T09:33:46+5:302021-09-21T09:34:11+5:30
एका कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करणाऱ्या कंपनीने लहान मुलांसाठी लसीची निर्मिती केली असून, ती लस अधिक प्रभावी असल्याचा दावा केला आहे.
वॉशिंग्टन: कोरोनाचे संकट अद्यापही जागतिक पातळीवर घोंघावत आहे. कोरोनाची दुसरी लाट कायम असून, यानंतर आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे सांगितले जात आहे. अशातच आता एका कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करणाऱ्या कंपनीने लहान मुलांसाठी लसीची निर्मिती केली असून, ती लस अधिक प्रभावी असल्याचा दावा केला आहे. (pfizer claims that our vaccine on coronavirus effective for children 5 to 11 years age group)
भारतातही कोव्हॅक्सिन लस लहान मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी आणण्याची तयारी सुरू असून, याच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. तर, अमेरिकेत १८ वर्षांखालील लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता फायझर कंपनीची लस ५ ते ११ या वयोगटातील मुलांसाठी प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने तसा दावा केला आहे.
संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्ण संधी; महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीचा IPO जाहीर, पाहा, डिटेल्स
लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता
तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला असून, त्यादृष्टीने जागतिक पातळीवर पावले उचलली जात आहेत. मात्र, बहुतांश लहान मुलांसाठी अद्याप मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू झालेले नाही. त्यामुळे आता त्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. फायझर कंपनीनुसार, ५ ते ११ या वयोगटातील मुलांसाठी आमची लस प्रभावी असून, लवकरच अमेरिका प्राधिकरणाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या वयोगटातील मुलांसाठी लसीकरण हा अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरू शकेल, असे म्हटले गेले आहे. फायझरची सहयोगी जर्मन कंपनी बायोएनटेक यांनी १२ वर्षांवरील मुलांसाठी लस तयार केली आहे. मात्र, त्याखालील वयोगटातील मुलांसाठी लस उपलब्ध नसल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर असलेली बंदी हटवण्याचा निर्णय अखेर अमेरिकेने घेतला आहे. नोव्हेंबरपासून निर्बंध हटवण्यास सुरुवात होईल. नव्या नियमांनुसार लस घेतलेल्या लोकांना अमेरिकेत प्रवेश मिळेल. अमेरिकेच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या लाखो लोकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेसाठी उड्डाण करण्याच्या ३ दिवस आधी प्रवाशांना कोरोना चाचणी करावी लागेल. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असायला हवा. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर प्रवाशांना क्वारंटिनमध्ये राहावे लागणार नाही. मात्र मास्क अनिवार्य असेल.