न्यू होरायझनने टिपली ‘चेरॉन’ची छायाचित्रे
By admin | Published: October 4, 2015 12:38 AM2015-10-04T00:38:48+5:302015-10-04T04:45:10+5:30
नासाच्या न्यू होरायझन यानाने प्लुटोच्या ‘चेरॉन’ या सर्वात मोठ्या चंद्राची आजवरची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे टिपली आहेत. त्यामुळे प्लुटोच्या अनेक भूगर्भीय रहस्यांचा उलगडा होण्यास
वॉशिंग्टन : नासाच्या न्यू होरायझन यानाने प्लुटोच्या ‘चेरॉन’ या सर्वात मोठ्या चंद्राची आजवरची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे टिपली आहेत. त्यामुळे प्लुटोच्या अनेक भूगर्भीय रहस्यांचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचा आणि प्लुटोच्या गहन आणि भीषण इतिहासावर प्रकाश पडणार असल्याचा दावा ‘नासा’तर्फे करण्यात आला आहे.
प्लुटो या सूर्यमालेतील ग्रहाबद्दल फारशी माहिती नाही. प्लुटोचा ‘चेरॉन’ हा सर्वात मोठा चंद्र प्लुटोच्या व्यासाच्या निम्म्या आकाराचा येतो. ‘चेरॉन’ हा चंद्र केवळ पर्वतीय आणि ओबडधोबड असल्याचा समज होता; पण तो पर्वतीय, उंच शिखरे, सपाट भूप्रदेश आणि भूपृष्ठावर वेगवेगळे रंग असणारा असल्याचे नव्या चित्रावरून दिसून येते.
कॅलिफोर्नियास्थित ‘नासा’च्या या मोहिमेचे प्रमुख रॉस बेअर म्हणाले की, आम्हाला प्रथमच सूर्यमालेतील एका ग्रहाच्या मोठ्या चंद्राची अशी अभूतपूर्व दृश्ये दिसून आली. ‘न्यू होरायझन’ यानाने १४ जुलै रोजी प्लुटोभोवती फेरी मारली आणि त्यावेळी टिपलेली छायाचित्रे २१ सप्टेंबर रोजी पाठविली. त्यात या चंद्राच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर ओबडधोबड, पर्वतीय भाग दिसतो. (वृत्तसंस्था)
या मोहिमेशी संबंधित अन्य एक शास्त्रज्ञ जॉन स्पेन्सर म्हणाले की, या चेरॉन चंद्राची ही छायाचित्रे पाहता तेथे मंगळाप्रमाणे परिस्थिती असल्याची जाणीव होते. त्यातून प्लुटो-चेरॉन यांच्यातील फरकही नजरेत भरतो. चेरॉन दोन्ही टोकांना लाल रंगाचा, तर प्लुटो मध्यभागी लाल रंगाचा भासतो. या चित्रातून चेरॉनचा नेमका आकार किती आहे, याचा अंदाज बांधता येईल.