६२ जणांना घेऊन जाणारे विमान समुद्रात कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 06:46 AM2021-01-10T06:46:28+5:302021-01-10T06:47:06+5:30
इंडोनेशियात घडलेली भीषण दुर्घटना; सर्व जण मरण पावल्याची भीती
जकार्ता : इंडोनेशियातील श्रीविजया एअर या कंपनीच्या विमानाने शनिवारी जकार्ताहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या चार मिनिटांतच ते समुद्रात कोसळले. या विमानातील प्रवासी, कर्मचाऱ्यांसह ६२ जण मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इंडोनेशियाच्या हवाई खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, श्रीविजया एअर कंपनीच्या ७३७ बोईंग प्रवासी विमानाने शनिवारी दुपारी १.५६ ला जकार्ताहून पोंटियानासाठी उड्डाण केले. यात ५६ प्रवासी व सहा कर्मचारी होते. नियंत्रण कक्षाशी संपर्क होता तेव्हा विमान ११ हजार फुटांवर होते. अवघ्या १ मिनिटात विमान १० हजार फूट खाली येऊन समुद्रात कोसळले.
उत्तर जकार्ताच्या परिसरात १०० छोटी बेटे आहेत. तेथील समुद्रात काही गोष्टी तरंगताना स्थानिक मच्छिमारांना आढळल्या. ते विमानाचे अवशेष असावेत, अशी चर्चा आहे. अद्याप याला इंडोनेशिया सरकारने दुजोरा दिलेला नाही. इंडोनेशियात वापरण्यात येणारी प्रवासी विमाने जुनी झाली आहेत. ती बाद करून नवी प्रवासी विमाने घ्यावीत, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. (वृत्तसंस्था)