PM प्रचंड यांना घेऊन जाणाऱ्या विमानाने वेळेपूर्वीच केले उड्डाण, ३१ प्रवासी विमानतळावरच अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:50 AM2023-12-01T10:50:52+5:302023-12-01T10:52:32+5:30
विमानाने वेळेपूर्वीच उड्डाण घेतल्याने ३१ प्रवासी विमानतळावरच अडकून पडले. त्यामुळे या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यूएईला (UAE) रवाना झाले. यूएईमधील कॉप २८ (COP28) हवामान परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रचंड यांना दुबईला घेऊन जाणारे विमान वेळापत्रकाच्या अगोदर निघाले. विमानाने वेळेपूर्वीच उड्डाण घेतल्याने ३१ प्रवासी विमानतळावरच अडकून पडले. त्यामुळे या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांना दुबईला घेऊन जाणाऱ्या नेपाळ एअरलाइन्सच्या विमानाने नियोजित वेळेच्या दोन तास आधी उड्डाण केले. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यामुळे काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३१ प्रवासी अडकले. बुधवारी दुबईला जाणारे विमान आरए २९९ रात्री ११.३० वाजता उड्डाण करणार होते, परंतु उड्डाणाच्या व्हीव्हीआयपी स्थितीमुळे विमानाने रात्री ९.३० वाजता उड्डाण केले, असे एअरलाइनने सांगितले.
पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड त्याच विमानात होते आणि कॉप २८ शिखर परिषदेसाठी शिष्टमंडळासह दुबईला रवाना होते. त्यामुळे विमानाचे लवकर उड्डाण करण्यात आले, असे एअरलाइनने सांगितले. या घटनेनंतर विमान कंपनीने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एक नोटीस जारी करत माफी मागितली आहे. या विमानाच्या यादीत २७४ प्रवासी होते आणि त्यापैकी ३१ प्रवासी विमानात चढू शकले नाहीत, ज्याचे वेळापत्रक दोन तासांनी बदलण्यात आले. तसेच, विमान कंपनीने सांगितले की, मोबाईल फोन आणि ईमेलद्वारे विमानाच्या नवीन सुटण्याच्या वेळेबद्दल कळवण्यात आले होते. परंतु ३१ प्रवाशांनी प्रतिसाद दिला नाही.
यूएईमध्ये होत आहे कॉप-२८ परिषद
यूएईमध्ये होणाऱ्या हवामान शिखर परिषदेत सहभागी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड हे नेपाळहून दुबईला गेले आहेत. कॉप २८ हवामान परिषदेत ते अनेक राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चाही करतील. दुसरीकडे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कॉप २८ हवामान परिषदेत सहभागी होण्यासाठी रात्री उशिरा दुबईला पोहोचले आहेत.