विमान दुर्घटना; १९८ मृतदेह रेल्वेने रवाना
By admin | Published: July 21, 2014 02:04 AM2014-07-21T02:04:35+5:302014-07-21T02:04:35+5:30
दुर्घटनाग्रस्त मलेशियन विमानाच्या ढिगाऱ्यांतून काढण्यात आलेले १९८ मृतदेह रशियासमर्थक युक्रेनियन बंडखोरांनी रविवारी एका वातानुकूलित रेल्वने हलविले
कीव : दुर्घटनाग्रस्त मलेशियन विमानाच्या ढिगाऱ्यांतून काढण्यात आलेले १९८ मृतदेह रशियासमर्थक युक्रेनियन बंडखोरांनी रविवारी एका वातानुकूलित रेल्वने हलविले. दरम्यान, बंडखोरांच्या ताब्यातील युक्रेनच्या या भागात अपघातस्थळापर्यंत विनाअडथळा पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे.
‘रिया नोवोस्ती’ या वृत्तसंस्थेनुसार, घटनास्थळावरून जवळपास १५ किलोमीटर अंतरावरील तोरेज भागातल्या एका स्टेशनवरून मृतदेह रेल्वेने हलविण्यात आले. रेल्वे बंडखोरांच्या नियंत्रणाखालील युक्रेनच्या डोनेत्सक शहराकडे रवाना झाली आहे. युरोपीय सुरक्षा आणि सहकार्य संघटनेचा (ओएससीई) प्रवक्ता मायकल बोसिऊरकीव यांनी सांगितले की, स्टेशनवर दुर्गंधी पसरली आहे. या मालगाडीच्या सुरक्षेसाठी तैनात बंडखोरांनी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ येईपर्यंत मृतदेह घेऊन न जाण्याचा संकल्प केला होता. तथापि, रेल्वे स्टेशनवरून रवाना झाली असून हिचा पहिला थांबा इलोवास्क येथे असेल. येथून रेल्वे राजधानी डोनेस्ककडे जाईल. ओएससीईच्या निरीक्षकांच्या मते, रेल्वेत १९८ मृतदेह आहेत. ओएससीईच्या निरीक्षकांना सशस्त्र बंडखोरांनी आज घटनास्थळी नेले.
फ्रान्सचा इशारा
दरम्यान, युक्रेन मुद्यावर तात्काळ आवश्यक कारवाई न केल्यास युरोपीयन युनियनमध्ये परिणाम भोगावे लागतील, असा इशारा फ्रान्सने रशियाला दिला आहे. जागतिक नेत्यांकडून रशियावर बंडखोर आणि युक्रेन सरकार यांच्यात शस्त्रसंधीसाठी दबाव वाढत आहे.
रशियाने दबाव वापरावा
बर्लिन : पूर्व युक्रेनमध्ये शस्त्रसंधी करार घडवून आणण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया समर्थक बंडखोरांवरील आपल्या प्रभावाचा वापर करावा, अशी मागणी जर्मन चॅन्सलेर अँजेला मर्केल यांनी केली आहे. पुतीन यांच्याशी त्यांनी शनिवारी दूरध्वनीवरून संवाद साधला. मलेशियन विमान अपघाताची आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटना अर्थात आयसीएओच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय चौकशी करण्यावर उभय नेत्यांमध्ये एकमत झाले. (वृत्तसंस्था)