टेक ऑफनंतर विमान तिरके झाले अन्... नेपाळमधील अपघाताचा VIDEO समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 02:33 PM2024-07-24T14:33:12+5:302024-07-24T14:39:40+5:30
Nepal Plane Crash Video : नेपाळमधील विमान अपघात दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे.
Nepal Plane Crash :नेपाळमध्ये पुन्हा एकदा एक मोठा विमानअपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर 9N-AME हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काहीवेळात कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात १९ जण होते ज्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात केवळ विमानाचा पायलट बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता या विमानाच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. काही क्षणात विमान खाली कोसळले आणि त्याने पेट घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
नेपाळची राजधानी काठमांडू येथे विमान कोसळले आहे. विमानातील १९ जणांपैकी १८ जणांचा मृत्यू झाला. जखमी पायलट कॅप्टन एम. शाक्य यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. सकाळी ११ वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले आणि काही क्षणातच ते कोसळले. 9N-AME हे विमान सौर्य एअरलाइन्सचे होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी १७ जण सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते, तर उर्वरित २ क्रू मेंबर्स होते.
अपघातानंतर लगेचच विमानतळावरील पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर विमानाला आग लागली. या आगीनंतर विमान पूर्णपण जळून खाक झाले. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओमध्ये विमान टेक ऑफनंतर अचानक तिरके झाले आणि विमानतळावर पुढे जाऊन कोसळले. यानंतर विमानाने पेट घेतला. क्षणात आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे कोणालाही पळता आले नाही.
A video captured moments before the plane crash at Kathmandu, Nepal today. The sight is both haunting and heartbreaking, a stark reminder of the fragility of life.
— Prerna Bhardwaj (@prernabhardwaj_) July 24, 2024
Thoughts and prayers with the families and friends of those affected. pic.twitter.com/ouO8uvwrd6
माध्यमांच्या वृत्तानुसार तांत्रिक दोषामुळे ही घटना घडली असल्याचे म्हटलं जात आहे. अपघातग्रस्त विमान इंजिन चाचणीसाठी पोखरा येथे जात होते. नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील लोक अभियंता आणि तंत्रज्ञ होते. हे विमान महिनाभर पोखरा येथील एका हँगरमध्ये ठेवण्यात आले होते.