झिम्बाब्बेमध्ये हवेतच विमानाचा स्फोट; प्रसिद्ध भारतीय खाण मालक अन् मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 07:48 PM2023-10-02T19:48:07+5:302023-10-02T19:49:30+5:30
रियोजिम या खाण कंपनीचे मालक हरपाल रंधवा आणि त्यांच्या मुलासह अन्य चार लोकांचा मृत्यू झाला आहे.
झिम्बाब्बेमध्ये एका छोटेखानी विमानाच्या अपघातात भारतीय खाण उद्योजक आणि त्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान एका हिऱ्याच्या खाणीजवळ कोसळले.
आयहरारे या स्थानिक वृत्त पोर्टलनुसार मशावाच्या जवामहांडे भागात आज एका विमानाला अपघात झाला. यामध्ये रियोजिम या खाण कंपनीचे मालक हरपाल रंधवा आणि त्यांच्या मुलासह अन्य चार लोकांचा मृत्यू झाला आहे.
रियोजिम ही कंपनी सोने आणि कोळशाच्या उत्पादनासोबतच निकेल आणि तांब्याचे देखील उत्पादन करणारी एक प्रमुख कंपनी आहे. हे विमानही रिजोजिमच्या मालकीचे होते. सेसना २०६ हे विमान शुक्रवारी हरारेहून मुरोवा हिरे खाणीच्या दिशेने जात होते. यावेळी तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान अपघातग्रस्त झाले. या विमानाचा हवेतच स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.
याविमानातून जे लोक प्रवास करत होत त्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन व्यक्ती झिम्बाब्बेच्या होत्या. पोलिसांनी नावे जाहीर केलेली नसली तरी रंधाव यांचे मित्र आणि पत्रकार होपवेल चिनोनो यांनी याची माहिती दिली आहे.