37 हजार फूट उंचीवर असताना पायलटला डुलकी, विमानाच्या लॅण्डिंगपूर्वी घडला प्रकार; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 08:03 AM2022-08-23T08:03:09+5:302022-08-23T08:03:24+5:30

विमान उतरण्याची वेळ आली असताना दोन्ही वैमानिकांना गाढ झोप लागली तर? केवळ कल्पनेनेच अंगावर शहारे येतात. पण, अशी घटना नुकतीच इथियोपियात घडली. 

Plane failed to descend as pilots reportedly fell asleep during flight | 37 हजार फूट उंचीवर असताना पायलटला डुलकी, विमानाच्या लॅण्डिंगपूर्वी घडला प्रकार; नेमकं काय घडलं?

37 हजार फूट उंचीवर असताना पायलटला डुलकी, विमानाच्या लॅण्डिंगपूर्वी घडला प्रकार; नेमकं काय घडलं?

googlenewsNext

अदीस अबाबा :

विमान उतरण्याची वेळ आली असताना दोन्ही वैमानिकांना गाढ झोप लागली तर? केवळ कल्पनेनेच अंगावर शहारे येतात. पण, अशी घटना नुकतीच इथियोपियात घडली. 

सुदानच्या खार्तून येथून इथियोपियाची राजधानी अदीस अबाबा येथे जात असलेल्या विमानाच्या दोन्ही वैमानिकांना लॅण्डिंगपूर्वी झोप लागली. त्यामुळे हे बोईग विमानतळावर उतरण्याऐवजी पुढे गेले. हवाई वाहतूक नियंत्रकांनी (एटीसी) तातडीने वैमानिकांना संदेशही पाठवला. मात्र, गाढ झोपेत असल्याने त्यांनी उत्तर दिले नाही. तेव्हा विमान ३७ हजार फूट उंचीवर होते.

ॲव्हिएशन हेरॉल्डच्या वृत्तानुसार, विमान अदीस अबाबा विमानतळाची धावपट्टी ओलांडून पुढे जाताच विमानाच्या स्वयंचलित यंत्रणेने (ऑटोपायलट सिस्टम) काम थांबवले. त्यामुळे केबीनमधील सायरन (धोक्याची सूचना देणारी घंटा) वाजला. त्याच्या आवाजाने वैमानिक झोपेतून जागे झाले. नेमके काय घडले हे लक्षात आल्यानंतर दोघांना दरदरून घाम फुटला. कसेतरी करून स्वत:ला सावरत त्यांनी विमान उतरवले. विमान उतरवण्यासाठी त्यांना २५ मिनिटे लागली. सुदैवाने विमान सुरक्षितरीत्या उतरले. कोणाला काही इजा झाली नाही.

विमानाने घेतला वळसा
विमान अदीस अबाबा येथे पोहोचल्यानंतरही उतरत नसल्याने हवाई वाहतूक नियंत्रकांनी (एटीसी) सतर्कतेचा इशारा जारी केला. उड्डयन निगराणी प्रणालीच्या डेटातूनही या घटनेला दुजोरा मिळाला. विमानाच्या मार्गाचे एक छायाचित्रही पोस्ट करण्यात आले आहे. त्यात या विमानाने अदीस अबाबा विमानतळाजवळ वळसा घेतल्याचे दिसते.

का घडली घटना?
उड्डयन विश्लेषक ॲलेक्स मॅंकेरास यांनी ट्वीटरवर या घटनेबाबत पोस्ट शेअर केली आहे. ही घटना गंभीर असून, वैमानिकांचा थकवा याला जबाबदार आहे, असे ते म्हणाले. अशा प्रकारची घटना यापूर्वी मे महिन्यातही घडली होती. न्यूयॉर्कहून रोमला जात असलेल्या विमानाचे दोन्ही वैमानिक झोपले होते. तेव्हा विमान ३८ हजार फूट उंचीवर उडत होते. 
 

Web Title: Plane failed to descend as pilots reportedly fell asleep during flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.