मोठं यश! वैज्ञानिकांना प्लास्टिक खाणारा किडा सापडला, विघटनाची समस्याच मिटली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 03:47 PM2022-06-10T15:47:48+5:302022-06-10T15:48:18+5:30
जगभरात दरवर्षी ३० कोटी टन प्लास्टिकचं उत्पादन होतं आणि याच्या विल्हेवाटाच्या समस्येमुळे वैज्ञानिक खूप चिंतेत होते. प्लास्टिकच्या विघटनावर अनेक वर्ष संशोधन सुरू होतं.
मेलबर्न-
जगभरात दरवर्षी ३० कोटी टन प्लास्टिकचं उत्पादन होतं आणि याच्या विल्हेवाटाच्या समस्येमुळे वैज्ञानिक खूप चिंतेत होते. प्लास्टिकच्या विघटनावर अनेक वर्ष संशोधन सुरू होतं. पण आता ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांच्या एका टीमनं या समस्येवरील तोडगा शोधून काढला आहे. वैज्ञानिकांनी एका अशा किड्याचा शोध लावला आहे की जो प्लास्टिक खाऊन ते नष्ट करुन टाकतो.
ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकांनी जोफोबास मोरियो नावाच्या किड्याचा शोध लावला आहे. या किड्याला सामान्यत: सुपरवर्म असं संबोधलं जातं. पॉलीस्टाइनिन खाऊन हे किडे जीवंत राहू शकतात. संशोधकांच्या दाव्यानुसार प्लास्टिक खाणाऱ्या किडाच्या या प्रजातीमुळे प्लास्टिकच्या पुनर्वापरच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकते.
"सुपरवर्म मिनी रिलायकलिंग प्लांट सारखं काम करतात. जे प्लॉलीस्टाइनिन चघळतात आणि आपल्यात असलेल्या बॅक्टेरियांना देतात", असं संशोधनात समाविष्ट असलेले डॉ. ख्रिस रिंकी यांनी सांगितलं.
क्विंन्सलँड विद्यापीठातील एका टीमनं तीन आठवड्यांत या किड्यांना विविध प्रकारचे आहार देऊन चाचणी केली. यात पॉलीस्टाइनिन खाल्लेल्या किड्यांच्या समूहाचं वजन वाढल्याचं लक्षात आलं. त्यानंतर टीमनं किड्यांच्या अंतर्गत प्रक्रियेची माहिती घेतली असता त्यांना पॉलीस्टाइनिन आणि स्टायरिन समूळ संपुष्टात आणण्याची क्षमता असल्याचं दिसून आलं. पण या रिसर्चमुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक विघटनासाठी कितपत मदत होईल याबाबत शंकाच आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ सध्या या किड्यांमधील कोणती क्षमता सर्वात प्रभावी आहे हे ओळखण्याचा अजूनही प्रयत्न करत आहेत. जेणेकरुन प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी त्यांचा वापर करता येईल.
जगभरात दरवर्षी ३०० दशलक्ष टन प्लास्टिक तयार आणि उत्पादन केले जाते. जगातील प्लास्टिक उत्पादनात युरोपचा वाटा २६ टक्के (६.६ दशलक्ष टन) आहे. त्याच वेळी, ३८ टक्के प्लास्टिक जमिनीत विघटीत केलं जातं. अमेरिकेत २०२१२ मध्ये, फक्त नऊ टक्के (२.८ दशलक्ष टन) प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यात आला होता. तर उर्वरित ३२ दशलक्ष टन प्लास्टिक कचऱ्यात टाकण्यात आलं होतं.
मायक्रोबियल जीनोमिक्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातील नमूद माहितीनुसार संशोधन करण्यात आलेला किडा प्लास्टिकची रासायनिक रचना मोडतो आणि असे १०० किडे १२ तासांत ९२ मिलीग्राम पॉलिथीन नष्ट करू शकतात. त्यांच्या मदतीने प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाची समस्या कमी होणार आहे.