कॅलिप्सो डीपच्या तळाशी १६,७०० फूट खोलीवर आढळला प्लास्टिक कचरा, प्रदूषण बघून संशोधकांनाही धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 10:50 IST2025-03-16T10:49:55+5:302025-03-16T10:50:10+5:30
पाणबुडी ४३ मिनिटे समुद्राच्या तळाशी राहिली आणि ६५० मीटर अंतर कापले.

कॅलिप्सो डीपच्या तळाशी १६,७०० फूट खोलीवर आढळला प्लास्टिक कचरा, प्रदूषण बघून संशोधकांनाही धक्का
अथेन्स : ग्रीसमधील कॅलिप्सो डीपच्या तळाशी १६,७०० फूट खोलीवर, शास्त्रज्ञांना धक्कादायक सत्य पाहायला मिळाले. येथे आढळणाऱ्या कचऱ्यात ८८% प्लास्टिक होते. महासागरातील सर्वांत खोल खंदकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी पोहोचण्यासाठी बार्सिलोना विद्यापीठातील संशोधकांनी लिमिटिंग फॅक्टर नावाच्या हाय-टेक पाणबुडीचा वापर करून कॅलिप्सो डीपच्या तळाचा शोध घेतला.
पाणबुडी ४३ मिनिटे समुद्राच्या तळाशी राहिली आणि ६५० मीटर अंतर कापले. यावेळी, जहाजांमधून टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि कचरा विखुरलेला होता. येथील समुद्राचा एक इंच भागही प्रदूषणमुक्त राहिलेला नाही, याच प्रकारे इतरही समुद्र प्रदूषित होत राहिले तर ते सजीवसृष्टीसाठी अत्यंत धोकादायक असेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
अहवाल काय सांगतो? -
८८% कचरा प्लास्टिकचा आहे आणि तो कोणत्या ना कोणत्या किनाऱ्यावरून वाहून येथे पोहोचतो.
प्लास्टिक पिशव्यांसारखा कचरा तळाशी साचतो. सूक्ष्म कणांत रूपांतरित होतो. जहाजांनी कचरा टाकल्याचे पुरावे आहेत.
हा धोक्याचा इशारा का आहे?
प्लास्टिक प्रदूषणामुळे दुर्मीळ सागरी प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.
सागरी परिसंस्थांना गंभीरपणे हानी पोहोचवू शकते.
सूक्ष्म प्लास्टिक कण अन्नसाखळीत प्रवेश करतात आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण करतात.
कॅलिप्सो डीप म्हणजे काय?
भूमध्य समुद्रातील सर्वांत खोल खंदक, ग्रीसच्या पेलोपोनीज किनाऱ्यापासून ६० किलोमीटर पश्चिमेस स्थित आहे.
येथील खोली ५,२६७ मीटर आहे. ज्यामुळे तो युरोपमधील सर्वांत खोल बिंदू बनतो. हे भूकंपप्रवण क्षेत्र आहे.
काय आहे उपाय?
समुद्रात कचरा कोणत्याही स्वरुपातील फेकण्यावर कडक निर्बंध असले पाहिजेत.
प्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनात कमीत कमी केला पाहिजे.
सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत समाजात व्यापक स्तरावर जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.