कृपा करुन पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा ब्रिक्समध्ये उपस्थित करु नका, चीनचा मोदींना संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 01:47 PM2017-09-01T13:47:24+5:302017-09-01T14:12:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पार पडणा-या ब्रिक्स परिषदेला हजेरी लावणार असून यावेळी पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करु नका असा अप्रत्यक्ष संदेशच चीनने मोदींना दिला आहे
बीजिंग, दि. 1 - पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पार पडणा-या ब्रिक्स परिषदेला हजेरी लावणार असून यावेळी पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करु नका असा अप्रत्यक्ष संदेशच चीनने मोदींना दिला आहे. पाकिस्तानशी संबधित दहशतवादाचा मुद्दा चर्चेला आल्यास आपला आक्षेप असेल असं चीनने सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी गोवामध्ये पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत बोलताना पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचं बोलले होते. यामुळे चीनला पुन्हा एकदा मोदी हा उल्लेख करतील अशी चिंता आहे.
'पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाचा मुद्दा आला की, भारत नेहमीच आपली चिंता व्यक्त करताना दिसतो. ब्रिक्स परिषदेत चर्चा करण्यासाठी हा योग्य विषय आहे असं मला वाटत नाही', असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग बोलल्या आहेत. हा विषय चर्चेला आला तर चीनी नेते आपला मित्रराष्ट्र पाकिस्तानची बाजू घेतील, ज्याचा परिणाम ब्रिक्स परिषदेवर होईल असंही हुआ चुनयिंग यांनी सांगितलं आहे.
'ब्रिक्स परिषदेकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे. परिषद यशस्वी व्हावी याकरिता संबंधित पक्ष मदत करतील अशी अपेक्षा आहे', असंही हुआ चुनयिंग बोलल्या आहेत. ब्रिक्समधील पाचही देशांना त्याचं हे आवाहन होतं, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे.
3 सप्टेंबरला ब्रिक्स परिषद पार पडत आहे. भारत सध्या मजबूत स्थितीत आहे, कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील दहशतवाद्यांना आश्रय देण्यावरुन पाकिस्तानला सुनावलं असून, आर्थिक मदत रोखण्याची धमकी दिली आहे. परिषदेत चिनी नेते पाकिस्तानचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानात हल्ले करणाऱ्या देशांतर्गत दहशतवादी संघटनांचा बीमोड केलात तरच 255 दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत मिळेल असे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने ही माहिती काँग्रेसला दिली आहे. पाकिस्तानला लष्करी सहाय्य मिळेल, परंतु त्यासाठी दहशतवादाविरुद्ध त्यांनी लढा देण्याची पूर्वअट आहे, असं अमेरिकेने आवर्जून नमूद केलं आहे. थोडक्यात, अमेरिकेने पाकिस्तानसाठी 255 दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी सहाय्याची तरतूद केली आहे आणि पाकिस्कानने दहशतवादी संघटनांना काबूत ठेवले तरच ती रक्कम त्यांना प्रत्यक्षात मिळेल अशी तजवीज केली आहे.