नरेंद्र मोदी चीनमध्ये, 24 तासात जिनपिंग यांच्याबरोबर सहा बैठका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 07:56 AM2018-04-27T07:56:08+5:302018-04-27T07:56:08+5:30
मोदी आणि जिनपिंग यांची भेट अनेकार्थांनी महत्त्वाची आहे.
वुहान (चीन)- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी रात्री उशीरा चीनच्या मध्यवर्ती भागांत असलेल्या वुहान शहरात पोहोचले. या दोन दिवसीय दौऱ्यात 24 तासात सहा वेळा मोदी व जिनपिंग यांच्यात बैठका होणार आहे. मोदी आणि जिनपिंग यांची भेट अनेकार्थांनी महत्त्वाची आहे.चीन दौऱ्यात मोदी जिनपिंग यांच्याशी अनौपचारिक संवाद साधणार आहेत. यावेळी जागतिक, प्रादेशिक आणि द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा होणार आहे. भारत आणि चीनचे संबंध अतिशय तणावपूर्ण स्थितीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींचा चीन दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी विशेष शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मोदी व जिनपिंग यांच्याच होणाऱ्या बैठकींमधील दोन महत्त्वाच्या बैठकांमध्ये दोन्ही देशातील सहा-सहा सदस्यांचं शिष्टमंडळही सहभागी होणार आहे. शुक्रवारी या दोन्ही बैठका पार पडणार आहेत. यातील पहिली भेट ही हुवई प्रॉर्विस म्युझियममध्ये होईल. तर दुसरी बैठक इस्ट लेक किनाऱ्याच्या गेस्ट हाऊसमध्ये होइल. यानंतर रात्री जेवणाच्या दरम्यानही दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार,या बैठकीला उच्चस्तरीय चर्चा म्हणणं चुकीचं ठरेल. या बैठकीसाठी विशिष्ट मुद्दे ठरले नाहीत. आतंकवाद, सीमा वाद असे काही मुद्देही यामध्ये असतील. या अनौपचारिक संवादादरम्यान कुठल्याही करारावर हस्ताक्षर होणार नाही, हे आधीच ठरलेलं आहे. शनिवारी मोदी व जिनपिंग यांच्यात 3 बैठका होणार आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास गुजराती जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोदी जिनपिंग यांच्यासाठी खास भेट घेऊन गेल्याचीही माहिती आहे. शनिवारी दुपारी जेवणानंतर मोदी वुहानमधून परत येतील. मोदी-जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनी मीडिया अतिशय सक्रियता दाखवते आहे. मोदी व जिनपिंग यांची भेट ऐतिहासिक असल्याचं चीनी मीडियाचं म्हणणं असून ही भेट त्यांना 30 वर्षांआधी झालेल्या डांग शाओपिंग व राजीव गांधी यांच्या भेटीची आठवण करुन देते आहे.