भारतातील सत्ताधारी नेत्याच्या हत्येचा कट उधळला; रशियानं केला दावा, नाव मात्र उघड केलं नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 08:46 AM2022-08-23T08:46:28+5:302022-08-23T08:46:55+5:30
भारतातील सत्ताधारी पक्षातील एका नेत्याची आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या करण्याचा कट आखणाऱ्या इसीस संघटनेच्या दहशतवाद्याला पकडल्याचा दावा रशियाने केला आहे.
मॉस्को :
भारतातील सत्ताधारी पक्षातील एका नेत्याची आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या करण्याचा कट आखणाऱ्या इसीस संघटनेच्या दहशतवाद्याला पकडल्याचा दावा रशियाने केला आहे. हा दहशतवादी मध्य आशियातील रहिवासी आहे. कोणत्या भारतीय नेत्यावर हल्ला करण्यात येणार होता, त्याचे नाव मात्र रशियाने उघड केलेले नाही.
रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस या गुप्तचर संस्थेने म्हटले आहे की, इसीस या संघटनेच्या एका दहशतवाद्याने भारतातल्या सत्ताधारी पक्षातील एका नेत्याची आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या करण्याचा कट आखला होता. त्यासाठी हा दहशतवादी भारतात येणार होता. मात्र, त्या हालचालींचा सुगावा लागताच त्याला अटक करण्यात आली. इसीसने त्याला आत्मघाती हल्ला करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले होते. या दहशतवाद्याचे नाव रशियाने जाहीर केलेले नाही.
भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी विशिष्ट धर्माचा अवमान करणारी वक्तव्ये केली होती. त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले.
अशीच कारवाई भाजपचे एक नेते नवीनकुमार यांच्यावरही करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यांचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले होते. या पार्श्वभूमीवर भारतातील सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या हत्येचा कट रशियाने एका दहशतवाद्याला पकडून उधळला ही घडामोड महत्त्वाची ठरते.