किम जोंग उन यांच्या 'त्या' फोटोची चर्चा, असं काय आहे त्यात?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 08:09 AM2022-12-22T08:09:52+5:302022-12-22T08:10:24+5:30
एका फोटोची चर्चा जगभरात सुरु आहे. हा फोटो आहे किम जोंग उन आणि त्यांच्या मुलीचा.
एक फोटो खूप काही सांगतो. फोटो बघताना लोक भूतकाळात जातात, आठवणींमध्ये रमतात. फोटोच्या निमित्तानं घडून गेलेला प्रसंग/ घटना पुन्हा जगून पाहतात; पण फोटोची ताकद फक्त भूतकाळाचा चेहरा दाखवण्याइतपतच मर्यादित नाही. भविष्यासंबंधीच्या अनेक शक्यताही तो वर्तवतो. अशाच एका फोटोची चर्चा जगभरात सुरु आहे. हा फोटो आहे किम जोंग उन आणि त्यांच्या मुलीचा. असं काय आहे त्या फोटोत?
आतापर्यंत किम जोंग उन आपल्या कुटुंबासमवेत सार्वजनिक ठिकाणी दिसणं तसं फारच दुर्मिळ. म्हणूनच मुलीसोबतच्या त्यांच्या फोटोबद्दल जगभरात चर्चा सुरू आहे. हा फोटो आहे उत्तर कोरियाने Hwasong-17ICBM या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण केलं त्यावेळेचा. या प्रक्षेपणाला किम जोंग उन आपल्या मुलीला घेऊन आले होते. तिचं नाव अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केलेलं नाही. कारण ते त्यांना माहीतच नाही.
किम जोंग उन यांच्या कुटुंबाची माहिती त्यांचे आजोबा किम II संग, वडील किम जोंग इल आणि त्यांची बहीण किम यो जोंग एवढ्यापुरतीच सीमित आहे. किम जोंग उन यांना किती मुलं आहेत, त्यात मुलगे किती, मुली किती हेदेखील उत्तर कोरियातल्या माध्यमांना खात्रीशीररित्या सांगता येत नाही. काही प्रसिद्धीमाध्यमांच्या मते ९ ते १० वर्षे वयाची जु ए ही किम जोंग उन यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी आहे. तीच त्यांची सर्वात लाडकी मुलगी असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
जु ए ही क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणप्रसंगी उपस्थित होती, याचे अनेक अर्थ काढले जात आहेत..
१. आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रक्षेपण हा लष्कर आणि उत्तर कोरियाच्या वर्चस्वाचा विषय. अशा प्रसंगी किम जोंग उन यांनी आपल्या मुलीसोबत असणं याचा अर्थ ही मुलगीच किम जोंग उन यांची उत्तराधिकारी असेल.
२. जगभरात ज्याचा चेहरा हा केवळ क्रूर हुकूमशहा याच अर्थानं पाहिला जातो, त्या चेहऱ्यामागे एक प्रेमळ बापही आहे, हे जगाला सांगण्याचा हा प्रयत्न असावा.
३. उत्तर कोरियाची शस्त्रसज्जता, क्षेपणास्त्र चाचण्या या फक्त संहारासाठी नसून त्या पुढच्या पिढीच्या सुरक्षेसाठीही आहेत, हा संदेश उत्तर कोरियाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि इतर देशांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असावा.
४. मुलीला सोबत आणून एका महत्त्वाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाकडे अमेरिकेचे जाणारे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा किम जोंग उन यांचा हा प्रयत्न असू शकतो.
५. अण्वस्त्रदृष्ट्या उत्तर कोरियाला सज्ज ठेवण्याचा वारसा पुढच्या पिढीकडेही असाच सोपवला जाणार, उत्तर कोरियाचा स्वभाव हा असाच राहणार हे सांगण्यासाठी किम जोंग उन हे आपल्या मुलीला घेऊन आले असावेत..
चेआँग सेआँग चँग या विश्लेषकाच्या मते किम जोंग उन यांना मुलगा असला तरी त्याच्यात नेतृत्वक्षमतेचा अभाव असेल तर ते त्याचा विचार उत्तराधिकारी म्हणून करणार नाहीत. आपल्या मुलीला क्षेपणास्त्र प्रक्षेपणाप्रसंगी घेऊन जाणं म्हणजे तिला आपला उत्तराधिकारी करण्याच्या प्रशिक्षणाचाच हा एक भाग असावा.
उत्तर कोरियातील महिला नेतृत्वावर लिखाण करणाऱ्या चुन सू जीन यांच्या मते उत्तर कोरियात किम जोंग उन यांच्या मुलीचे शासक म्हणून स्वागत होण्याची शक्यता अगदीच शून्य आहे; पण काही राजकीय तज्ज्ञांच्या मते उत्तर कोरियात पितृसत्ताक पद्धती असली तरी केवळ लिंगाधारित दुजाभाव करून स्त्रीला सत्ता नाकारली जाऊ शकत नाही.
आता किम जोंग उन यांनी वयाची चाळिशी ओलांडली असून त्यांनी आपला उत्तराधिकारी कोण याचा विचार पक्का करण्याची वेळ आली आहे. जु ए सोबतचा फोटो हा त्याचाच एक भाग असू शकतो असं नाॅर्थ कोरिया लीडरशीप वाॅचच्या संचालक मिशेल मॅडन म्हणतात. रचेल मिनयंग यांच्या मते किम जोंग उन हे आपले आजोबा आणि वडिलांपेक्षा वेगळा विचार करणारे आहेत. त्यांच्या प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी महिलांना नेमलं आहे. त्यामुळे किम जोंग उन हे नक्कीच आपल्या मुलीचा उत्तराधिकारी म्हणून विचार करत असतील. मात्र किम जोंग उन यांचा इतिहास पाहता त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे जगाला शेवटपर्यंत कळू शकणार नाही!
किम जाेंग यांच्या घराण्याचा ‘इतिहास’!
राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या मते, किम जोंग उनला तीन मुलं आहेत. त्यातली जु ए ही दुसऱ्या क्रमांकाची मुलगी आहे. तरीही आपला उत्तराधिकारी म्हणून किम जोंग उन तिचा विचार करत असतील तर त्यांचा इतिहास पाहता ते योग्य आहे. कारण किम जोंग उन यांच्या वडिलांनाही अनेक मुलं होती; पण त्यांना किम जोंग उन यांच्यातच शासन करण्याची क्षमता जाणवली आणि त्यांनी किम जोंग उनला आपला उत्तराधिकारी नेमला.