इस्रायल लवकरच घेणार इराणचा बदला! नेतन्याहू सरकारने बनवला खास 'प्लॅन', अशी आहे रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 06:34 PM2024-04-17T18:34:31+5:302024-04-17T18:35:39+5:30
Israel Iran conflict: इस्त्रायल थेट हल्ल्याऐवजी इराणचा वेगळ्या प्रकारे काटा काढू शकेल असा संरक्षण क्षेत्रातील अभ्यासकांचा अंदाज आहे
Israel preparing for attack against Iran: इराणने शनिवारी रात्री आणि रविवारी मध्यरात्री इस्रायलवर शेकडो मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले. इराणने थेट इस्रायलवर हल्ला चढवल्यानंतर आता इस्रायलने देखील प्रतिहल्ल्याची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे. इस्रायलने अद्याप कोणतीही आक्रमक पावले उचलली नसली तरी नजीकच्या भविष्यात ते काहीतरी मोठे करू शकतात असा अंदाज बांधला जात आहे. इस्रायलने इराणच्या भूमीवर सामरिक आणि वेदनादायी ठरेल अशा हल्ल्याची योजना आखली असल्याचे सांगितले जात आहे. सध्या संपूर्ण प्रदेशावर युद्धाचे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे मंत्रिमंडळ यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे म्हटले जात आहे.
द सनच्या रिपोर्टनुसार, इराणने इस्रायलवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देश एकमेकांना धमक्या देत आहेत. शांततेसाठी आंतरराष्ट्रीय आवाहन असूनही, नेतन्याहूच्या समर्थकांनी वारंवार आग्रह धरला आहे की प्रतिहल्ला हाच एकमेव उपाय आहे. एका गुप्तचर स्त्रोताने उघड केले की इस्रायलच्या मंत्रिमंडळाने आता त्यांचा बदला धोरणात्मक परंतु वेदनादायक असावा यावर सहमती दर्शविली आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले की, इस्रायलचा हल्ला मर्यादित क्षेत्रापुरता असणे अपेक्षित होते परंतु आता ते कदाचित इराणच्या हद्दीत हल्ला करू शकतात.
इराणमधील संधीचा फायदा घेण्यासाठी इस्रायल संरक्षण दल (IDF) वैयक्तिक स्तरावर तयारी करत असल्याचे कान न्यूजने वृत्त दिले आहे. इस्त्रायलचे सैन्य थेट इराणच्या भूमीवर हल्ला करेल असा अंदाज अनेक अहवालांनी व्यक्त केला आहे. अशा हालचालीमुळे दोघांमधील तणाव वाढेल. इस्त्रायल थेट हल्ल्याऐवजी इराणी दूतावास किंवा 'प्रॉक्सी' संघटनांना लक्ष्य करू शकेल, असा अनेकांचा विश्वास आहे.