पंतप्रधान इंडोनेशियात दाखल, जोको विडोडो यांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 12:00 PM2018-05-30T12:00:49+5:302018-05-31T12:06:59+5:30
पंतप्रधान इंडोनेशियातील उद्योजकांची भेट घेणार असून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्षांनी त्यांना संध्याकाळी भोजनाचे आमंत्रण दिले आहे.
जाकार्ता- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन देशांचा दौरा कालपासून सुरु झाला आहे. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर असा हा दौरा असणार आहे. इंडोनेशियामध्ये पोहोचल्यावर त्यांचे भारतीय समुदायाने उत्साहात स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे ट्वीटरवरुन आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांची मार्डेका पॅलेस येथे भेट घेतली आहे.
संध्याकाळी पंतप्रधान इंडोनेशियातील उद्योजकांची भेट घेणार असून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्षांनी त्यांना संध्याकाळी भोजनाचे आमंत्रण दिले आहे. तसेच पंतप्रधान इंडोनेशियातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतील.
उद्या 31 मे रोजी पंतप्रधान थोड्या वेळासाठी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे जातील आणि मलेशियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान महाथिर मोहंमद यांचे अभिनंदन करतील. त्यानंतर पंतप्रधान सिंगापूरला रवाना होतील. सिंगापूरमध्ये अर्थ, कौशल्यविकास, नगरनियोजन, कृत्रिम बुद्धीमत्ता अशा अनेक विषयांवर त्यांची चर्चा होईल आणि ते काही निवडक उद्योगांच्या कार्यकारी संचालकांची भेट घेतील. शुक्रवारी ते राष्ट्रपती हालिमा याकोब यांची भेट घेतील व पंतप्रधान ली सिन लूंग यांच्याशी शिष्टमंडळासह चर्चा करतील. या भेटीनंतर ते नानयांग तंत्रज्ञान विद्यापिठाला भेट देऊन तेथे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. संध्याकाळी शांग्री ला संवाद परिषदेत सहभागी होतील. 1 जून रोजी क्लीफर्ड पियर येथे एका कोनशिलेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल. येथे महात्मा गांधींच्या अस्थींचे विसर्जन झाले होते.