"भारताचे जागतिक स्तरावरील यश म्हणजे एक असामान्य यशोगाथा"; अमेरिकेकडून मोदींचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 03:28 PM2024-01-18T15:28:27+5:302024-01-18T15:29:21+5:30
नुकत्याच दावोसमध्ये झालेल्या बैठकीत अमेरिकेन परराष्ट्र सचिवांचे विधान
India US Relations, PM Modi: भारत म्हणजे असामान्य यशोगाथा अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे तोंडभरून कौतुक केले. भारत सरकारच्या उल्लेखनीय कामगिरीचा भौतिकदृष्ट्या फायदा झाला आहे आणि अनेक भारतीयांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रयत्नांमुळे द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत, तसेच लोकशाही आणि अधिकारांवरही चर्चा झाली आहे, असेही त्यांनी 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)च्या वार्षिक बैठकीत सांगितले.
सध्या दोन्ही देशांमधील संबंध सलोख्याचे होत आहेत. त्यातून सकारात्मक बदल घडतील अशी आम्हाला आशा आहे आणि भारतदेखील अशाच विचारांचा असल्याने आम्हाला त्याचा आनंद आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भारताचा वेगवान आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांची निर्मिती असूनही हिंदू राष्ट्रवादाचा उदय हा अमेरिकेसाठी चिंतेचा विषय आहे का? या प्रश्नाचे उत्तर ब्लिंकन यांनी रोखठोक उत्तर दिले.
भारताबद्दलच्या त्यांच्या आणि अमेरिकेच्या दृष्टिकोनावर चर्चा करताना ब्लिंकन म्हणाले, "आम्ही एक विलक्षण यशोगाथा पाहत आहोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे आम्हाला परिणामही दिसले आहेत. त्या यशामुळे अनेक भारतीयांचे जीवनमान बदलले आहे. त्यांना भौतिकदृष्ट्या फायदा झाला आहे आणि एक सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचा भारतीयांवर झालेला प्रभाव उल्लेखनीय आहे, असेही ब्लिंकन यांनी स्पष्ट केले.