पाकिस्ताननं कारवाई करण्याची गरज; जिनपिंगसोबतच्या भेटीत मोदींकडून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 08:48 PM2019-06-13T20:48:46+5:302019-06-13T21:13:29+5:30
एससीओच्या बैठकीदरम्यान चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्य़ासोबत मोदींची चर्चा
बिश्केक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिश्केकमधील एससीओच्या बैठकीदरम्यान चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबतच्या चर्चेत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्ताननंदहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं मोदी आणि जिनपिंग यांनी म्हटलं. दक्षिण आशिया दहशतवादमुक्त व्हावा, असं भारताला वाटतं. मात्र त्यासाठी पाकिस्तानकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याचं मोदी जिनपिंग यांना म्हणाले.
एससीओच्या बैठकीदरम्यान मोदी आणि जिनपिंग यांच्यात चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखलेंनी दिली. 'दोन देशांच्या प्रमुखांमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्यासंबंधी चर्चा झाली. वुहान परिषद सफल झाल्याचं दोन्ही नेत्यांनी म्हटलं. यानंतर मोदींनी पुढील अनौपचारिक परिषदेसाठी भारतात येण्याचं आमंत्रण दिलं. जिनपिंग यांनी हे आमंत्रण स्वीकारलं. यावेळी मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते,' अशी माहिती गोखलेंनी दिली.
दोन्ही देशांमधील संबंध सुधारल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक प्रश्न मार्गी लागल्याचं मोदींनी जिनपिंग यांना सांगितलं. यावेळी मोदींनी बँक ऑफ चायनाला भारतात शाखा उघडण्यास देण्यात आलेली परवानगी आणि मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलेलं यश यांचा उल्लेख केला.