'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल', PM मोदींचा रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 07:05 PM2024-07-09T19:05:29+5:302024-07-09T19:07:02+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत.

PM Modi Russia Visit :'Order of St. Andrew the Apostle', PM Narendra Modi honored with Russia's highest civilian award | 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल', PM मोदींचा रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल', PM मोदींचा रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

PM Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. सोमवारी (दि. 8) पीएम मोदींचे विमान रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले. तर, आज पंतप्रधान मोदींचा रशियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' हा पुरस्कार दिला. 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी(दि9) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' देऊन सन्मानित केले. पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी पुतिन यांचे आभार मानले. तसेच, हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान असून, भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीचे हे प्रतिबिंब असल्याचे म्हटले. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी दहशतवाद, परस्पर सहकार्य आणि शांतता प्रस्थापित करण्यावर चर्चा केली.

यावेळी मोदी पुढे म्हणाले की, भारत-रशिया भागीदारी महत्त्वाची आहे. आमचा विश्वास आहे की, शांतता आणि स्थिरतेसाठी प्रयत्न सुरूच राहिले पाहिजेत. या दिशेने आम्ही सातत्याने काम करू. सर्वच क्षेत्रात संबंध दृढ करावे लागतील. आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा फायदा दोन्ही देशांनाच नाही, तर संपूर्ण जगाला होईल. पुतीन यांना उद्देशून मोदी म्हणाले की, तुम्ही दोन्ही देशांदरम्यान जो धोरणात्मक संबंधांचा पाया घातला, तो काळाच्या ओघात मजबूत होत गेला आहे. 

पुतिन यांनी केले अभिनंदन
यावेळी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पीएम मोदींचे अभिनंदन केले. ते म्हणाले की प्रिय मित्र, या सर्वोच्च पुरस्काराबद्दल मी आपले मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला चांगले आरोग्य आणि यश मिळो, ही शुभेच्छा. मी भारतातील लोकांच्या शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो.

पंतप्रधान मोदींचा दौरा अत्यंत यशस्वी : सर्गेई लावरोव
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव म्हणाले की, पीएम मोदींचा हा दौरा यशस्वी झाला. पीएम मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी द्विपक्षीय अजेंडाच्या प्रत्येक पैलूवर चर्चा केली. आंतरराष्ट्रीय परिस्थिती, G-20, BRICS, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्समधील आमचे सहकार्य, यावर चर्चा झाली. मला खात्री आहे की, या दौऱ्यामुळे सर्व क्षेत्रांना मोठी चालना मिळेल.

Web Title: PM Modi Russia Visit :'Order of St. Andrew the Apostle', PM Narendra Modi honored with Russia's highest civilian award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.