"मोदींनी पुतीन यांना योग्यच सांगितलं", PM मोदींचे फॅन झाले फ्रान्सचे राष्ट्रपती; UNGA मध्ये केलं तोंडभरुन कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 10:19 AM2022-09-21T10:19:12+5:302022-09-21T10:20:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात शांघाय सहकार्य संघटनेच्या (SEO) शिखर परिषदेत सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींनी मांडलेल्या भूमिकेचं यावेळी जगभरातून कौतुक केलं जात आहे.
नवी दिल्ली-
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात शांघाय सहकार्य संघटनेच्या (SEO) शिखर परिषदेत सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींनी मांडलेल्या भूमिकेचं यावेळी जगभरातून कौतुक केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घातला. संघटनेच्या सर्व सदस्य देशांनी परस्परांना आपल्या हद्दीतून मुक्त वाहतुकीची मुभा द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. तसंच सध्याचा काळ युद्धाचा नसल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीत त्यांना सल्ला दिल्याचं मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं. मोदींच्या याच भूमिकेचं आता पाश्चिमात्य देशांकडून तोंडभरुन कौतुक केलं जात आहे.
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल माक्रोन यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत त्यांनी मांडलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबर म्हणाले होते की ही युद्धाची वेळ नाही. हे पाश्चिमात्य देशांचा सूड उगवण्याचा किंवा पूर्वोत्तर देशांविरोधात पाश्चिमात्य देशांनी कारवाई करण्याची ही वेळ नाही. ही वेळ सर्वांच्या सार्वभौमत्वाची आहे. सध्याच्या अडचणींना एकत्रितरित्या सामोरं जाण्याची ही वेळ आहे", असं फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल माक्रोन म्हणाले.
मोदींच्या विधानाचं अमेरिकेकडूनही कौतुक
SCO शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेनंही कौतुक केलं. "मला वाटतं की पंतप्रधान मोदी जे म्हणाले ते खरं आणि न्याय्य आहे. त्याचं स्वागतच केलं पाहिजे. रशियानं संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या मूलभूत अटींचे पालन करणं आणि बळजबरीनं ताब्यात घेतलेले प्रदेश परत करणं हे योग्य आहे. युद्ध संपलं पाहिजे. युक्रेन किंवा युनायटेड स्टेट्स, सर्वांनी या मूळ प्रस्तावाभोवती केंद्रस्थानी ठेवण्यास सक्षम असावं. तुम्ही तुमच्या शेजाऱ्याचा प्रदेश बळानं जिंकू शकत नाही. जर रशियानं ते प्रयत्न सोडले तर युक्रेनमध्ये शांतता सर्वात वेगानं आणि निर्णायकपणे येईल", असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन म्हणाले.
New York, USA | Indian PM Modi was right when he said that time is not for war, not for revenge against the west or for opposing the west against east. It is time for our sovereign equal states to cope together with challenges we face: French President Emmanuel Macron at #UNGApic.twitter.com/HJBZJELhEF
— ANI (@ANI) September 20, 2022
सुलिव्हन म्हणाले की, जगातील प्रत्येक देशानं असं केलेलं पाहण्याची त्यांची इच्छा आहे. युक्रेनमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी रशियाला स्पष्ट आणि निःसंदिग्ध संदेश देणं अत्यावश्यक आहे आणि जगातील प्रत्येक देशानं तसं करावं अशी आमची इच्छा आहे. त्यांना हवं असल्यास ते सार्वजनिकपणे तसं करू शकतात. किंवा ते खाजगीरित्या तशी भूमिका घेऊ शकतात.
ही वेळ युद्धाची नाही- पंतप्रधान मोदी
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी युद्ध परिस्थितीवर आपलं स्पष्ट आणि रोखठोक मत मांडलं. "आजचं युग युद्धाचं नाही आणि हे मी तुमच्याशी फोनवर बोललो आहे. शांतता भारत आणि रशिया अनेक दशकांपासून एकमेकांसोबत आहेत", असं मोदी पुतीन यांना म्हणाले. मोदींच्या विधानाला अमेरिकेनं पाठिंबा देताना मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासोबत उझबेकिस्तानमध्ये केलेल्या बैठकीत मांडलेली भूमिका सत्य आणि योग्य आहे, असं म्हटलं. अमेरिका नेहमीच याचं स्वागत करते, असं व्हाईट हाऊसनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
जगातील प्रत्येक देशाने एकच संदेश दिला पाहिजे - अमेरिका
जगातील प्रत्येक देशानं असं केलेले पाहण्याची त्यांची इच्छा आहे. ते पुढे म्हणाले की, त्या प्रदेशात शांतता निर्माण करण्यासाठी रशियाला स्पष्ट आणि निःसंदिग्ध संदेश पाठवणे अत्यावश्यक आहे आणि जगातील प्रत्येक देशाने तसे करावे अशी आमची इच्छा आहे. त्यांना हवे असल्यास ते सार्वजनिकपणे करू शकतात. त्यांना हवे असल्यास ते खाजगीरित्या करू शकतात.