इस्रायल निवडणुकीत नेतन्याहूंना मोदींचा आधार, पोस्टरमध्ये दोघांचे हातात हात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 09:12 AM2019-07-29T09:12:13+5:302019-07-29T09:12:28+5:30
नेतन्याहूंच्या लिकुड पक्षानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न चालवला आहे.
तेल अवीवः इस्रायलमध्ये 17 सप्टेंबरला पुन्हा निवडणूक होत असून, त्यासाठी बेंजामिन नेतन्याहूंनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. नेतन्याहूंच्या लिकुड पक्षानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न चालवला आहे. लिकुड पक्षाच्या जाहिरातबाजीत नेतन्याहूंबरोबर मोदी पोस्टरमध्ये झळकतायत. तर दुसरीकडे इस्रायलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर नेतन्याहू असलेले पोस्टरही जागोजागी लावण्यात आले आहेत. तेल अवीवच्या किंग जॉर्ज रस्त्यावर लिकुड पक्षाचं मुख्यालय आहे, तिथे या तिन्ही आंतरराष्ट्रीय नेत्यांबरोबर नेतन्याहूंची जवळीक असल्याचं दाखवण्याचा जाहिरातीतून प्रयत्न केला आहे.
नेतन्याहू यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्यांबरोबर असलेल्या घनिष्ठ संबंधांचा निवडणुकीत वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक काळ इस्रायलचे पंतप्रधान राहिलेल्या नेतन्याहू यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याची चर्चा आहे. त्याच्याच कार्यकाळात भारत आणि इस्रायलमध्ये आर्थिक, लष्कर आणि राजकीय संबंध वेगानं वृद्धिंगत झाले आहेत. मोदींच्या 2019च्या विजयानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून शुभेच्छा देणारे ते पहिले नेते आहेत. नेतन्याहू निवडणुकीच्या 8 दिवस अगोदरच 9 सप्टेंबरला भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. नेतन्याहूंचा वाईट काळ सुरू असून, मोदींबरोबर फोटो खेचल्यानं आपल्याला फायदा होईल, अशी त्यांना आशा आहे, इस्रायलचे लेखक योसी वर्टर यांनी यासंदर्भात एक लेखही लिहिली आहे.
In @netanyahu election compaign
— Team #IndiaFirst 🇮🇳 (@TeamIndiaFirst) July 28, 2019
ads: Photo of @narendramodi@KremlinRussia_E & @realDonaldTrump
....
Anyone remembered #NewWorldOrder tweets of
@DrGPradhan Sir ?
Plz Post the screenshot in comment box with date of tweet pic.twitter.com/M5v0oxOC0E
बहुमत सिद्ध करू न शकल्यानं पुन्हा निवडणूक
इस्रायलमध्ये यंदाच्या मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तरीही गेल्या सहा आठवड्यांत ते अन्य पक्षांसोबत आघाडी करण्यात अपयशी ठरल्याने बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. यामुळे खासदारांनी सरकार स्थापन करण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन संसद भंग करण्याचा प्रस्ताव संमत केला. आता इस्रायलमध्ये 17 सप्टेंबरला पुन्हा निवडणूक होत आहे.
इस्रायलच्या इतिहासात आजपर्यंत कधीही एकाच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मात्र, जास्त जागा जिंकलेला पक्ष इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करत होता. यामुळे इस्रायलमध्ये ही पहिलीच वेळ आहे की पंतप्रधान आघाडी करण्यात अपयशी ठरले आहेत. नेतन्याहू यांनी दक्षिणपंथी पक्षांसोबत गेल्या सहा आठवड्यात अनेकदा वाटाघाटी, चर्चा केल्या. मात्र, त्यात यश न आल्याने शेवटी संसद भंगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. उपस्थित 120 पैकी 119 खासदारांनी मतदानात भाग घेतली. यामध्ये 74 खासदारांनी संसद भंग करण्याच्या बाजूने आणि 45 जणांनी विरोधात मतदान केले होते.