भारत-UAE 21व्या शतकाचा नवा इतिहास लिहित आहे; PM मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 10:02 PM2024-02-13T22:02:47+5:302024-02-13T22:04:02+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या UAE दौऱ्यावर आहेत. यावेळी अबुधाबीमध्ये पंतप्रधानांनी 'अहलान मोदी' कार्यक्रमाला संबोधित केले.
PM Narendra Modi At Abu Dhabi: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या UAE दौऱ्यावर आहेत. UAE ची राजधानी अबुधाबीमध्ये पंतप्रधानांनी 'अहलान मोदी' कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पीएम मोदींनी भारत आणि UAE च्या विकासावर भाष्य केले. 'आज भारत आणि यूएई मिळून 21व्या शतकाचा नवा इतिहास लिहित आहे. भारताची ओळख नव्या कल्पना आणि नवनवीन शोधांनी होत आहे. आज भारत पर्यटन स्थळ म्हणूनदेखील ओळखला जातोय. भारतात जी डिजिटल क्रांती झाली आहे, ते तुम्हा सर्वांना माहीत आहे. जगभरातून याचे कौतुक झाले, आता तुम्हालाही याचा फायदा घेता येईल,' असं मोदी यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी, पीएम मोदींनी अबुधाबीमध्ये हिंदू मंदिरासाठी जमीन दिल्याबद्दल यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे आभार मानले. पंतप्रधान यूएईला पोहोचताच दोन्ही नेत्यांमध्ये विस्तृत चर्चा झाली. अबुधाबीतील BAPS मंदिर हे राष्ट्रपतींच्या भारताप्रती असलेल्या आत्मीयतेचे आणि UAE च्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
PM Shri @narendramodi addresses '#AhlanModi' event in Abu Dhabi, UAE. https://t.co/IMYaYv6nBt
— BJP (@BJP4India) February 13, 2024
पीएम मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...
-आजचा सशक्त भारत प्रत्येक पावलावर आपल्या लोकांच्या पाठीशी उभा आहे. गेल्या 10 वर्षात तुम्ही पाहिले आहे की, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना जिथे-जिथे समस्यांचा सामना करावा लागला, तिथे भारत सरकारने त्वरीत पावले उचलली. युक्रेन, सुदान, येमेन आणि इतर संकटांमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर काढले आहे आणि त्यांना भारतात आणले. जगाच्या विविध भागात स्थायिक झालेल्या आणि काम करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी सरकार अहोरात्र काम करत आहे.
-भारत आणि यूएई मिळून 21व्या शतकाचा नवा इतिहास लिहित आहे. यासाठी तुम्हा सर्वांचा मोठा पाठिंबा आहे, तुम्ही येथे करत असलेल्या कष्टातून भारतालाही ऊर्जा मिळत आहे. तुम्ही सर्वजण भारत आणि UAE मधील विकास आणि मैत्री मजबूत करत राहा. आज भारत आणि UAE मिळून जगाचा विश्वास मजबूत करत आहे. भारताने अतिशय यशस्वी G20 शिखर परिषद आयोजित केल्याचेही तुम्ही सर्वांनी पाहिले. यामध्ये आम्ही यूएईला भागीदार म्हणून आमंत्रित केले. आज जग भारताकडे विश्वबंधू म्हणून पाहत आहे. जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा तेथे पोहोचणाऱ्या पहिल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
-UAE ने भारताच्या सहकार्याने कार्ड सिस्टमला जीवन असे नाव दिले आहे. लवकरच UAE मध्ये UPI देखील लॉन्च होणार आहे. यामुळे UAE आणि भारतीय खात्यांमध्ये अखंड व्यवहार करता येतील. भारताच्या वाढत्या क्षमतेने जगाला आशा निर्माण केली. आज भारताची ओळख नव्या कल्पना आणि नवनवीन शोधांनी निर्माण होत आहे. आम्ही 50 कोटी लोकांना बँकिंगशी जोडले, लोकांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या, खेड्यापाड्यातील आणि ग्रामीण भागातील लोकांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही 1.5 लाखांहून अधिक आरोग्य मंदिरे बांधली. ज्यांनी भारताला भेट दिली, त्यांना माहिती आहे की भारतात किती वेगाने बदल होतोय.
-भारताचे यश हे प्रत्येक भारतीयाचे यश आहे. 10 वर्षात भारत 11व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतून जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला. माझा प्रत्येक भारतीयाच्या क्षमतेवर एवढा विश्वास आहे की, त्या आधारावर मी गॅरेंटी देत आहे. इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत आपला भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपला भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे. भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला. भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला ध्वज रोवला आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे, हे प्रत्येक भारतीयाचे ध्येय आहे.