दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 10:09 PM2024-09-23T22:09:45+5:302024-09-23T22:11:46+5:30
PM Modi US Visit: 'मानवतेचे खरे यश आपल्या सामूहिक सामर्थ्यात, युद्धभूमीवर नाही.'
PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते शनिवारी (21 सप्टेंबर) अमेरिकेत दाखल झाले. यादरम्यान त्यांनी जोन बायडेन यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. दरम्यान, आज(23 सप्टेंबर) युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या 79 व्या सत्रात बोलताना पंतप्रधान मोदींनी जागतिक दहशतवाद आणि शांततेच्या मुद्द्यावर आपली महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.
जागतिक शांततेसाठी...
यूएनमध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मी येथे भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी आलो आहे. आम्ही भारतातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. शाश्वत विकास यशस्वी होऊ शकतो, हे आम्ही भारतात दाखवून दिले. यशाचा हा अनुभव जगासोबत शेअर करण्यास आम्ही तयार आहोत. मानवतेचे खरे यश आपल्या सामूहिक सामर्थ्यात, युद्धभूमीवर नाही. जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमधील सुधारणा महत्त्वाच्या आहेत.
Speaking at Summit of the Future at the @UN. https://t.co/lxhOQEWEC8
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2024
दहशतवाद एक गंभीर धोका
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, एकीकडे दहशतवाद हा जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे, तर दुसरीकडे सायबर सुरक्षा, सागरी आणि अवकाश ही संघर्षाची नवीन क्षेत्रे बनत आहेत. तंत्रज्ञानाच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरासाठी संतुलित नियमन आवश्यक आहे. आम्हाला जागतिक डिजिटल प्रशासन हवे आहे, ज्यामध्ये सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित राहील. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) एक पूल बनावा, अडथळा नाही. जागतिक भल्यासाठी भारत आपला DPI सामायिक करण्यास तयार आहे.
आमच्या संबंधांना आणखी गती द्यायची आहे
यूएनमधील भाषणापूर्वी पंतप्रधान मोदींनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्या. यामध्ये द्विपक्षीय संबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.